देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वनविभाग देवरुख यांचा कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाच्या नेचर क्लबच्यावतीने यावेळी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मानद वन्यजीव रक्षक (रत्नागिरी जिल्हा) श्री. प्रतिक मोरे यांनी “रत्नागिरी जिल्ह्यातील जैवविविधता” या विषयावर विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी वनविभाग देवरुखचे वनरक्षक आकाश कडूकर, छाया गोपणे , सहयोग कराडे, सुरज तेली, व बाबासाहेब ढेकळे तसेच सामाजिक वनीकरणच्या सुप्रिया काळे उपस्थित होत्या. उद्घाटनप्रसंगी समन्वयक प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी प्रास्ताविक करताना प्रथम मान्यवरांची ओळख करून दिली व कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. यानंतर प्राचार्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर प्रतिक मोरे यांनी पॉवरपॉइंट तसेच चित्र फितींच्या माध्यमातून या विषयातील विविध संकल्पना स्पष्ट केल्या. त्यामध्ये त्यांनी देवराई व त्यांचे महत्व, स्थानिक औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती, तसेच विशेषतः या जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या भुई चक्र, भुई गोंडा व दिपकाडी सारख्या दुर्मिळ वनस्पती व त्यांच्या संगोपनासाठी चाललेले प्रयत्न याची माहिती दिली. त्यांनी विशेषतः कोकणातील अभयारण्य व परिसरात आढळणाऱ्या बहुसंख्य पशुपक्षांची विविधता, त्यांची जीवनसरणी व त्यांची वैशिष्टे यावेळी विद्यार्थ्यांना छायाचित्रांद्वारे समजावून सांगितली. ट्रॅप कॅमेरांच्या माध्यमातून करण्यात येणारे रानकुत्रा, बिबट्या, लाल खेकडा यासारख्या वन्यजीवांचे चित्रीकरण तंत्रज्ञानसंबंधी माहिती देऊन प्रत्यक्ष चित्रित केलेले काही व्हिडीओ सादर केले.
विविध वन्यजीवांना त्यांच्या प्रत्यक्ष चित्रणातून समजावून घेणे विद्यार्थ्यांसाठी फार कुतुहलाचे व माहितीपूर्ण होते. विद्यार्थ्यांनी देखील प्रश्नोत्तरे करून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी विषय शिक्षक प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. कार्यक्रमामध्ये महविद्यलयाच्या सर्व विभागातील द्वितीय वर्षातील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष व माजी पालकमंत्री श्री. रविंद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आहे.














