सावंतवाडी : पाणी पुरवठा सभापतींनी राजीनामा दिला असला तरी शिवसेना एवढ्यावर समाधानी नाही. पाणीपुरवठा विभागात गैरव्यवहारातून अदा करण्यात आलेली रक्कम पूर्ण वसूल होत नाही तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब आणि महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर यांनी दिली आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते बाबू कुडतरकर, देव्या सूर्याजी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, ॲड. सायली दुभाषी आणि महिला शहर प्रमुख भारती मोरे उपस्थित होत्या.
पत्रकार परिषदेत बोलताना संजू परब यांनी सांगिते की, पाणी पुरवठा विभागात झालेल्या गैरव्यवहारातील सर्व रकमेची वसुली झालीच पाहिजे. पाणीपुरवठा विभागानंतर आता आरोग्य विभागातही मोठा गैरव्यवहार झाला असून तोही लवकरच पुराव्यानिशी जनतेसमोर आणला जाईल, असे ते म्हणाले.
पाणी पुरवठा विभागात पहिली दोन बिले अदा झाल्यानंतर तिसरे बिल काढताना शिवसेनेच्या दोन महिला नगरसेवकांनी ते रोखून धरले आणि मोठा घोटाळा उघडकीस आणत पालिकेचे नुकसान टळले. आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत नेहमीच पारदर्शक कारभार आणि सुसंस्कृती जपली असून, पालिकेचा कारभार जनतेच्या पैशातून चालत असल्याने तो पूर्णपणे पारदर्शक असला पाहिजे, हीच शिवसेनेची भूमिका असल्याचे परब यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत ॲड. नीता सावंत-कविटकर यांनी कागदपत्रांसह भ्रष्टाचाराची माहिती समोर आणली. आरोग्य विभागात अवघ्या १० लाख रुपयांची किंमत असलेले मशीन तब्बल २२ लाख रुपयांना खरेदी दाखवून १० ते १२ लाखांचा फरक दाखवत मोठा गैरव्यवहार केला गेला आहे. तसेच पाणीपुरवठा विभागाचे रजिस्टर गायब झाले असून केवळ अडीच लाख रुपयांचा माल आणून तब्बल ४७ लाख रुपयांची बिले काढण्यात आली, ज्यातून सुमारे २५ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
पाणीपुरवठा घोटाळा शिवसेनेने बाहेर काढल्यामुळेच अखेर सभापतींना राजीनामा द्यावा लागला आहे. आता आरोग्य विभागातील घोटाळाही लवकरच पूर्णपणे उघड केला जाईल. सावंतवाडीच्या जनतेला पारदर्शक कारभार मिळवून देण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या विचारांवर चालत नगरसेवक म्हणून सातत्याने कार्यरत राहू, असा पुनरुच्चार शिवसेना नेत्यांनी शेवटी केला.













