सावंतवाडी : नगर परिषदेतील सभागृहातील सर्व घडामोडींनंतर बैठकीच्या शेवटी प्रतीक बांदेकर यांनी स्वतःहून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. आपली भूमिका स्पष्ट करताना बांदेकर म्हणाले, “पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचारावरून माझ्यावर चुकीचे आरोप करून विरोधक माझी बदनामी करत आहेत. यामुळे माझ्या प्रतिमेला डाग लागण्यासोबतच माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. म्हणूनच मी दोन दिवसांपूर्वीच नगराध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला होता.
ते पुढे म्हणाले, “मी सभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत १७ लाखांच्या एका बिलाचा प्रस्ताव समितीसमोर आला होता. माझ्यासह समितीच्या सदस्यांनी ते बिल रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हिशोब मागितला. त्यानंतरच माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात झाली. या राजकीय चिखलफेकीमुळे माझ्या पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लागत होते. मी माझे चारित्र्य जपतो; त्यामुळे या पदावर न राहता मी राजीनामा दिला आहे. पद सोडले तरी नगरसेवक म्हणून मी माझ्या प्रभागातील लोकांची कामे करतच राहीन, असे स्पष्ट केले.












