फोंडाघाट : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS) मुंबई, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) फोंडाघाट येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘एच.आय.व्ही./एड्स (HIV/AIDS) जनजागृती मोहीम’ मोठ्या उपस्थितीत आणि गांभीर्याने पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य मा. श्री. बी. पी. सोनवणे हे होते.एच.आय.व्ही./एड्सबाबत गैरसमज दूर व सखोल मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रमुख वक्त्या व मार्गदर्शक पवार मॅडम आणि परब सर यांनी उपस्थितांना एच.आय.व्ही. आणि एड्स या विषयावर सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “आजच्या तरुण पिढीमध्ये एच.आय.व्ही./एड्सबाबत अनेक गैरसमज आणि भीती पसरलेली दिसून येते. अपुऱ्या माहितीमुळे समाजात या आजाराविषयी अंधश्रद्धा निर्माण होतात. म्हणूनच महाविद्यालयीन वयामध्येच योग्य आणि शास्त्रीय माहिती मिळणे अत्यंत आवश्यक आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “सुरक्षित आरोग्यदायी सवयींचे पालन करणे, दूषित रक्ताचा वापर न करणे, वापरलेल्या सिरिंजचा पुन्हा वापर टाळणे आणि स्वतःच्या आरोग्याविषयी सजग राहणे हीच या आजारापासून बचावाची खरी गुरुकिल्ली आहे. एच.आय.व्ही. बाधित व्यक्तींशी भेदभाव न करता त्यांना सहानुभूती, आधार आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन देणे हे आपल्या समाजाचे कर्तव्य आहे. आजच्या तरुणांनी योग्य माहितीचा प्रसार करून समाजात एड्समुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
मार्गदर्शनानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा आणि समाजात एच.आय.व्ही./एड्सबाबत शास्त्रीय माहितीचा प्रसार करून भेदभावमुक्त वातावरण निर्माण करण्याचा दृढ संकल्प करत ‘जनजागृती व आरोग्य प्रतिज्ञा’ घेतली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत सूत्रबद्ध व प्रभावी सूत्रसंचालन तसेच शेवटी सर्व उपस्थितांचे आभार प्रदर्शन निदेशक स्वप्नील विश्वांभरे यांनी केले. प्राचार्य मा. श्री. बी. पी. सोनवणे , संस्थेचे गटनिदेशक ए. के. शिरोडकर, निदेशक भास्कर पाटील, सतीश मेस्त्री, गणेश मराठे, सायली तळवडेकर, निदेशक अभिषेक जोशी ; कनिष्ठ लिपिक एल. जी. असोलकर, IMC लिपिक मयुरेश पराडकर, भंडारपाल राहुल पाटील तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी एस. एस. आचरेकर, रामचंद्र इस्वलकर आणि संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी/विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













