दसरोत्सव बुधवार २१ ऑक्टोबर रोजी होणार साजरा
शिरगाव (प्रतिनिधी) : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि चौऱ्याऐंशी खेड्यांचे अधिष्ठान मानल्या जाणाऱ्या देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री देवी पावणाई देवालयात रविवार, ११ ऑक्टोबरपासून पारंपरिक रीतिरिवाजांनुसार शाही थाटात नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून सुरू होणारा हा उत्सव धार्मिक विधी, पारंपरिक वाद्यांचे वादन, पालखी प्रदक्षिणा आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. ऐतिहासिक परंपरेचे जतन करण्याची प्रथा आजही येथे श्रद्धेने जपली जाते.
नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज सकाळी ८ वाजता सप्तशती पाठाचे वाचन, सकाळी ९ वाजल्यापासून श्री देवीचे दर्शन व ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. दुपारी १२ वाजता देवीची आरती व नैवेद्य, तर दुपारी १ वाजल्यापासून पुन्हा दर्शन व ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजल्यानंतर मंदिराच्या सभामंडपात घडशी व गोंधळी यांचे सुश्राव्य गायन आणि वादन होईल. सायंकाळी ७ वाजता नौबत, रात्री ९ वाजता प्रवचन (पुराण) आणि रात्री १० वाजता देवीची आरती होणार आहे.
रात्री १०.३० वाजता श्री देवीच्या पालखीची प्रदक्षिणा काढण्यात येईल. पालखी मंदिरात परतल्यानंतर सभामंडपात घडशी व गोंधळी यांचे गायन व वादन होईल. मध्यरात्री १२ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून, त्यानंतर आरती करून दिवसाच्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता होईल. हे सर्व कार्यक्रम नऊ दिवस नियमितपणे पार पडतील. या काळात गणवेशधारी पहारेकरी देवीसमोर खडा पहारा देण्याची परंपराही जपली जाते.
दहाव्या दिवशी सकाळी नवचंडी होम करण्यात येईल. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना होईल. रात्री देवीच्या पालखीची प्रदक्षिणा झाल्यानंतर मंदिराच्या सभामंडपात नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. पहाटे लळिताचा कार्यक्रम आणि काकड आरतीने नवरात्रोत्सवाची सांगता होईल.
बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा ऐतिहासिक शाही थाटात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त इनामदार श्री देवी पावणाई आणि श्री देव सिद्धेश्वर देवालयात आकर्षक विद्युत रोषणाई करून मंदिर परिसर सजविण्यात येईल. श्री देवी पावणाईसह अन्य देवदेवतांना वस्त्रालंकारांनी सजविण्यात येणार असून, देवतरंगांनाही पारंपरिक पद्धतीने सजविले जाईल.
ऐतिहासिक धार्मिक परंपरा, राजेशाही थाट आणि पारंपरिक विधी यांचा संगम असलेला साळशी येथील नवरात्रोत्सव व दसरोत्सव हे गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक मानले जाते. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे.













