शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना समाजभानाच्या जाणिवेचा संस्कार ! पालक- नागरिकांकडून कौतुक !

केंद्रशाळा फोंडा नं. १ मार्फत वनराई बंधाऱ्याची उभारणी !

फोंडाघाट : शासनाच्या जलसंधारण व पाणी अडवा-पाणी जिरवा या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी जीवन शिक्षण विद्यामंदिर केंद्रशाळा फोंडा नं. १, वनराई बंधारा बांधण्यात आला. शालेय उपक्रमांतर्गत शाळेच्या मागील बाजूस असलेल्या नदीमध्ये हा बंधारा उभारण्यात आला.

पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग भूजल पातळी वाढविण्यासाठी व्हावा, तसेच जलसंधारणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांविषयी जागृती निर्माण झाली.

या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रेया नानचे, शिक्षिका रंजना पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय रेवडेकर, उपाध्यक्ष समृद्धी हळदिवे, तसेच दीप्ती देसाई,रूपाली मरये, वेदिका राणे, वासुदेव पारकर,अपूर्वा गोसावी, वर्षाराणी गांगुर्डे, स्वयंपाक मदतनीस अनिता शिरोडकर,स्वाती सावंत यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शाळा, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आणि सदस्य, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित सहभागातून हा उपक्रम उत्साहात पार पडला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक विचार रुजण्यासोबतच जलसंधारणाच्या कार्यात लोकसहभागाचे महत्त्व आणि शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना समाजभागाच्या जाणिवेचा संस्कारही अधोरेखित झाला. या उपक्रमाचे शिक्षण प्रेमी पालक आणि ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे…