वेंगुर्ल्यातील वांयंगणी मोबारवाडीतील ५१ तोळे सोन्याच्या चोरीचा पर्दाफाश!

घरकाम करणाऱ्या महिलेनेच लुटले मालकिणीचे घर!

एक दागिना मोडण्याच्या मुहामुळे सापडली जाळ्यात!

सर्व दागिने जप्त. संशयित आरोपीलाही केली अटक

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यातील वांयंगणी-मोबारवाडी येथे ज्येष्ठ महिलेच्या घरातून तब्बल ५१५ ग्रॅम म्हणजेच सुमारे ५१ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या धाडसी चोरीचा सिंधुदुर्ग पोलिसांनी यशस्वी तपास करून पर्दाफाश केला आहे. कोणताही ठोस सुराग नसताना तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या चोरीचा छडा लावला. धक्कादायक बाब म्हणजे, घरातच काम करणाऱ्या मार्टिना डुमिन लुद्रिक (वय २७, रा. दाबोली-मोबारवाडी) हिनेच ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. चोरी केलेले सुमारे २० लाख रुपये किमतीचे सर्व सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या पत्रकार परिषदेवेळी, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोल्हे, या गुन्ह्याचा तपास काम करणारे पोलीस उपनिरीक्षक योगेश कांबळे आदी उपस्थित होते.

वायंगणी-मोबारवाडी येथील सलोनी सुधीर लोलयेकर (वय ७२) यांच्या राहत्या घरातून ५१५ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या मौल्यवान दागिन्यांची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. या प्रकरणी २३ सप्टेंबर २०२६ रोजी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १६५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

घरातील मौल्यवान दागिने चोरीला गेल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. चोरीचा ठोस पुरावा किंवा स्पष्ट सुराग नसतानाही पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपासासोबतच गोपनीय बातमीदारांकडून माहिती गोळा करण्यात आली. संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले.

तपासादरम्यान लोलयेकर यांच्या घरात काम करणाऱ्या मार्टिना डुमिन लुद्रिक हिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान तिने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर चोरीच्या दागिन्यांचा शोध घेतला असता, हे दागिने तिने स्वतःच्या राहत्या घराशेजारी असलेल्या पडक्या घरात लपवून ठेवल्याचे उघड झाले.पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी तपासणी करून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त केले. त्यामुळे सुमारे २० लाख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला. घरात काम करणाऱ्या व्यक्तीनेच मालकिणीच्या घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे.

वेंगुर्ले पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली. पोलीस उपनिरीक्षक योगेश कांबळे, पोलीस हवालदार योगेश सराफदार, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, पोलीस नाईक स्वप्नील तांबे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज परुळेकर, जयेश सरमळकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल सिंधु मोंगल आणि होमगार्ड आरोसकर यांनी या तपासात सहभाग घेतला.
कोणताही ठोस सुराग नसताना तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि संशयितांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून पोलिसांनी चोरीचा छडा लावला. विशेष म्हणजे, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आल्याने वेंगुर्ले पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

एक दागिना मोडण्याच्या मुहामुळे सापडली जाळ्यात!

सलोनी लोलयेकर यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना प्रथम गोवा व त्यानंतर मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. लोलयेकर कुटुंबीय यांच्या घरामध्ये चार शिकारी कुत्रे असून घर कामासाठी चार जण होते. घरफोडी झाली नव्हती, कपाट उघडून हे दागिने चोरीस गेले होते. घर काम करणाऱ्या या चार जणांविरुद्ध दुसरी व्यक्ती या घरात येऊन ही चोरी करू शकत नाही असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. यातील दोन घर कामगार परप्रांतीय होते तर दोघीजणी याच गावातील होत्या. फिर्यादीने दागिने चोरीचा दुसऱ्याच घर कामगारावर संशय व्यक्त केला होता. मात्र पोलिसांनी यशस्वी तपास काम करत, त्या दागिन्यांसह या संशयित आरोपीला पकडले. एक दागिना मोडण्याच्या व नवीन दागिना करण्याच्या प्रयत्नात ही संशयित आरोपी महिला पोलिसांच्या जाळ्यात सापडली. यात सुवर्णकार असोसिएशन नेही पोलिसांना मदत केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले.