ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वरुणकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन!
वयाच्या ६४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
कणकवली : आपल्या अभिनयाने, दिग्दर्शनाने आणि रंगभूमीवरील समर्पित योगदानाने नाट्यरसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारे कणकवलीतील ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यदिग्दर्शक आणि अभिनेते सुहास वासुदेव वरुणकर (वय ६४) यांचे रविवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने कणकवलीच्या नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील एक अनुभवी आणि समर्पित व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. ते कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगर येथील रहिवासी होते. राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागात त्यांनी सेवा बजावली होती.
सुहास वरुणकर यांनी अक्षरसिंधू साहित्य कला मंचच्या माध्यमातून अनेक नाट्यकृतींमध्ये अभिनय करतानाच दिग्दर्शनाचीही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. रंगभूमीवरील त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. राज्य परिवहन महामंडळाच्या नाट्यस्पर्धांमध्ये सिंधुदुर्ग विभागाला अनेक पारितोषिके मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. केवळ स्वतःच्या अभिनय आणि दिग्दर्शनापुरते मर्यादित न राहता त्यांनी अनेक कलावंत घडविण्याचेही महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा अनेक नवोदित कलाकारांना लाभ झाला.
रविवारी सायंकाळी घरी असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच उपजिल्हा रुग्णालयात शहरवासीयांनी मोठी गर्दी केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. सुहास वरुणकर यांच्या निधनाने कणकवलीतील नाट्यप्रेमी, कलावंत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींमधून हळहळ व्यक्त होत आहे.













