मसुरे चांदेरवाडी येथे जिल्हा बँक कर्मचाऱ्यानी बांधला वनराई बंधारा!

मसुरे | झुंजार पेडणेकर :

जलसंधारण आणि पाणलोट विकासाच्या क्षेत्रात एक आदर्श पाऊल उचलत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मसूरे शाखा आणि येथील स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून मसुरे चांदेरवाडी येथे श्रमदानातून ‘वनराई बंधारा’ बांधण्यात आला. पावसाळ्याच्या दिवसांत वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे आणि परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

वाढत्या जलसंकटावर मात करण्यासाठी आणि जलसाक्षरतेचा संदेश देण्यासाठी बँक आणि ग्रामस्थांनी एकत्र येत हा स्तुत्य उपक्रम राबवला. वनराई बंधाऱ्यामुळे स्थानिक पातळीवर पाणी साचण्यास मदत होईल, ज्याचा फायदा शेती आणि ग्रामस्थांना मिळणार आहे. बँक केवळ आर्थिक व्यवहारांपुरती मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जोपासत अशा लोकउपयोगी उपक्रमांत नेहमीच अग्रेसर असते, हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

हा बंधारा बांधण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी मेहनत घेतली. यावेळी मसूरे शाखेच्या वतीने शाखाधिकारी येसूबाई कांदळगावकर आणि लिपिक रवींद्र मोहिते यांनी विशेष मार्गदर्शन व सहभाग नोंदवला. याशिवाय बँक सखी सौ. रोही गावकर,

पोलीस पाटील सोनल भोगले, आशा सेविका शुभांगी मुळीक, मदतनीस भाग्यश्री आंगणे, संतोष भोगले, सर्वेश भोगले, मनीष भोगले, सुधा भोगले, गुरुप्रसाद भोगले, प्रसाद भोगले, आनंद भोगले, शिवप्रसाद भोगले, सृष्टी लाड, वेदिका आशिष भोगले, आराध्या आशिष भोगले, सोहम संजय बागवे आदी.

सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान केल्यामुळे हा वनराई बंधारा अल्पावधीतच पूर्णत्वास आला. या यशस्वी उपक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक मसूरे शाखा आणि चांदेरवाडीच्या ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.