बर्फीचे गाव बनलेय ठिपकुर्ली ! गावात तयार झालाय रोजगाराचे साधन!!
गाववाल्यांच्या कामगिरीने बनला अस्सल ब्रॅन्ड
संतोष वायंगणकर
सिंधुदुर्ग : फोंडाघाट-कोल्हापूर मार्गावर भोगावती साखर कारखान्याच्या थोड पुढे गेल्यावर परिते गाव लागतो. परितेकडे जाणाऱ्या रस्त्याने सरळ दोन कि.मी. अंतरावर गेल्यावर ठिपकुर्ली नावाच एक गाव लागत. गावात प्रवेश करताच खमंग खव्याचा स्वाद आपणाला थांबायला लावतो. अवघ्या ७ हजार लोकवस्तीच असलेले गाव. गावची लोक शेतीत रमतात. ऊसाचे मळे, मळयातली घर आणि घराशेजारी किंवा घरांसमोरच शेडमध्ये त्या घरची बाई किंवा शेतकरी पुरूष भल्या मोठ्या कढईत दुध आठवताना, ढवळताना दिसणार… हे दृश्य गावात सगळीकडेच आपणाला फिरताना दिसून येते. दुध, साखर यापासून चुलींवर बनवलेली बर्फी या गावात घरोघरी बनवतात. हे जाणून घेण्याची उत्सुकता तर होतीच. नेमक गाव कस आहे. कुठे आहे हे दै.प्रहार आणि प्रहार डिजिटलच्या वाचकांना समजावा यासाठी शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी गावात फिरून प्रत्यक्ष पाहिले तेच वाचकांसाठी देत आहोत.
चाळीस वर्षापूर्वी ठिपकुर्ली गावात कोणतीही फार उद्योगाची कल्पना डोक्यात न घेता दुध, साखरेची बर्फी बनवण्याला सुरूवात झाली. एकाचे एकवीस नव्हेत तर आज तब्बल २५ जणांच्या घरी, दारी चविष्ट खव्याची बर्फी बनवली जाते. ठिपकुर्लीच्या सुनिल मुडळेंना भेटलो आणि त्यांच्याकडुन ठिपकुर्लीच्या बर्फीची कहाणी जाणून घेतली. दररोज सकाळी गावातल्याच शेतकऱ्यांनी डेअरीला घातलेल दुध आम्ही घेतो आणि चुलीवर या मोठ्या कढईत दुध आठवतो. या प्रक्रियेला दोन तास लागतात. मी माझी पत्नी, मुलगा असे माझं कुटुंबच या आमच्या व्यवसायात काम करतात. ज्याठिकाणी त्यांनी ही बर्फी बनवतात अगदी त्याला लागूनच त्यांच घर आणि ऊसाचा मळा, भाजीपाला अशी सर्व पिकही सुनिल मुडळे घेतात. गावातील अनेक कुटुंब ही हाच व्यवसाय करतात. कोणतीही भेसळ न करता फक्त दुध आणि साखर यापासून ही बर्फी बनवतो असं म्हणत सुनिल यांनी बर्फीचा छान फ्रेश तुकडाच हातात ठेवला. आणि खरच ही बर्फी खाल्ल्यावर व्वा…क्या बात है ! असे उद्गार यायलाच पाहिजेत. अशी स्वादिष्ट बर्फी अखंड कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध झाली आहे.
गेल्याकाही वर्षात गावच नाव सर्वदूर पसरल आहे. यामुळे आम्ही दररोज बनवलेली बर्फी गावातच येऊन ग्राहक घेऊन जातात. यामुळे आम्ही बाहेर नेऊन बर्फी विक्री करत नाही. एखाद गांव कस व्यवसायाभिमुख होऊ शकत त्याच उत्तम आणि आदर्शवत उदाहरण म्हणून ठिपकुर्ली गावाच देता येईल. गावातील ग्रामस्थांनीच स्वत:च बर्फी बनवण्याचा व्यवसाय करत बर्फीच्या या व्यवसायात ठिपकुर्लीचा वेगळा ब्रँड बनवला आहे. खवय्यांनी मुद्दाम होऊन एकदातरी ठिपकुर्लीला जायलाच हवं.












