त्या मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर अज्ञात इसमाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल ; पोलीस निरीक्षक अमित यादव यांची माहिती
कणकवली : शहरातील गणपती साना येथे मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी एक पुरुष जातीचा मृतदेह सापडला होता. दरम्यान या मृतदेहाची अद्याप ओळख देखील पटली नाही. मात्र पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत सदर मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला होता. तद्नंतर पुढील तपास सुरू झाला.
पोलीस यंत्रणेने तो मृतदेह कोणाचा ? तो कुठून आला ? याबाबत सगळी पडताळणी करून पाहिली मात्र त्याचा कणकवली शहरात केवळ एक दिवसच वावर असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत दिसून आले. मात्र त्यांची ओळख काही अद्याप पटलेली नाही.
दरम्यान त्या अनोळखी पुरुष जातीच्या प्रेतावरून कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू दाखल करण्यात आला होता. मात्र या मृतदेहाच्या स्थितीवरून तो खुनच असल्याच्या चर्चा शहरात रंगू लागल्या होत्या. पोलिसांनी त्या दृष्टीने देखील तपास सुरू केला. शेवटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर अज्ञात इसमाविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दखल करण्यात आला असल्याची माहिती कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अमित यादव यांनी दिली. याप्रकरणी वेगवान तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.











