मसुरे | झुंजार पेडणेकर
प्राथमिक शिक्षकांवर सातत्याने लादल्या जाणाऱ्या ऑनलाईन लिंक, शालेय वेळेतील प्रशिक्षणे आणि विविध उपक्रमांचे फोटो व अहवाल अपलोड करण्याच्या कामांविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती (शाखा सिंधुदुर्ग) आक्रमक झाली आहे. याविरोधात बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत जिल्हा प्रशिक्षण संस्था, ओरोस येथे लक्षवेधी धरणे आंदोलन केले जाणार आहे.
”शिक्षकांनी शिकवायचे की ऑनलाईन लिंक आणि अहवाल अपलोड करायचे? यामुळे प्रत्यक्ष अध्यापनावर विपरीत परिणाम होऊन शिक्षकांवर ताण येत आहे,” असा सवाल संघटनेने केला आहे.
अनावश्यक ऑनलाईन कामे बंद करा: ऑनलाईन लिंक, फोटो व अहवाल अपलोड करण्याचे काम थांबवावे.
शैक्षणिक वेळेचे रक्षण: शालेय वेळेतील प्रशिक्षणांचे प्रमाण कमी करून शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ द्यावा.
सुलभक नियुक्तीस विरोध: शिक्षकांना वारंवार प्रशिक्षणासाठी सुलभक (Facilitator) म्हणून नियुक्त करू नये; त्याऐवजी विषयतज्ज्ञ व उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करावा.
उपक्रमांची उपयुक्तता तपासावी: विविध उपक्रमांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीला केंद्रस्थानी ठेवून नियोजन करावे.
मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे व सरचिटणीस गिल्बर्ट फर्नांडिस यांनी दिला आहे












