सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आगामी १५ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी येथील जिमखाना मैदान येथे एका भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा सावंतवाडी शहरासह तालुक्यातील गरजू रुग्ण व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपाचे सावंतवाडी नगरपरिषदचे नगरसेवक तथा शहर प्रवक्ते सिद्धार्थ भांबुरे यांनी केले आहे. येथील भाजप शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आवश्यक आरोग्य तपासणीच्या सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी मळेवाड, वेंगुर्ला, बांदा आणि आंबोली येथे पार पडलेल्या आरोग्य शिबिरांना नागरिकांचा मोठ्या संख्येने व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता, त्याच धर्तीवर सावंतवाडी येथेही नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवावा, असे श्री भांबुरे यांनी नमूद केले.
या मोफत आरोग्य शिबिरात रुग्णांची वैद्यकीय तपासणी व निदान, ऑपरेशनची आवश्यकता असल्यास पुढील उपचाराचे नियोजन, तसेच शासनांच्या विविध योजनांखाली संबंधित रुग्णालयात उपचारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय शिबिरामध्ये नेत्ररोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा, दंतरोग, जनरल मेडिसिन, त्वचारोग आणि फिजिओथेरपी आदी विविध आजारांवर उपचार केले जाणार आहेत.
या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे सह्याद्री फाउंडेशनचे पदाधिकारी व भाजपचे इतर प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असून, भारतीय जनता पार्टी व सह्याद्री फाउंडेशनतर्फे या शिबिराला विशेष सहकार्य लाभले आहे. पत्रकार परिषदेस नगरसेवक तथा शहर अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेवक दिपाली भालेकर, नगरसेवक दुलारी रांगणेकर, नगरसेवक सविता टोपले, नगरसेवक नीलम नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, दिलीप भालेकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.













