जनावरांच्या देखभालीचा खर्च गाडी मालकालाच द्यावा लागणार
मालवण | प्रतिनिधी : कत्तलीच्या उद्देशाने प्राण्यांची अवैध व क्रूरपणे वाहतूक केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा आणि देखभालीचा पूर्ण खर्च जमा केल्याशिवाय जप्त केलेल्या वाहनाचा ताबा मालकाला मिळणार नाही, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे.
वैभववाडी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१/२०२५ अन्वये कत्तलीच्या उद्देशाने प्राण्यांची अवैध वाहतूक करताना ‘टाटा इंट्रा’ (क्रमांक एम एच ०७ एजे ४३१२) हे वाहन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी व वाहन मालक समीर मधुकर सावंत (रा. भडगाव, ता. कुडाळ) याने जप्त झालेले वाहन ताब्यात मिळवण्यासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कणकवली यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
वाहनाचा ताबा आरोपीला मिळण्याच्या अर्जावर ‘गाय वासरू गोशाळा, खंबाळे (वैभववाडी)’ यांनी तीव्र हरकत घेत न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला.
या हस्तक्षेप अर्जाची दखल घेत न्यायदंडाधिकारी (वर्ग-१) कणकवली यांनी ३१ मार्च २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला. जप्त केलेल्या ६ जनावरांच्या चारा-पाण्याचा आणि देखभालीचा खर्च दिल्याखेरीज आरोपीला वाहनाचा ताबा दिला जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
कणकवली न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान देत आरोपी समीर सावंत याने ओरोस येथील जिल्हा न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर सुनावणीदरम्यान अर्जदार, सरकारी पक्ष आणि गाय वासरू गोशाळा, खंबाळे या तिन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हा न्यायालयाने ७ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपीचा अर्ज फेटाळून लावला. कणकवली न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला मूळ आदेशच जिल्हा न्यायालयाने कायम ठेवला.
न्यायालयाच्या या निर्णयानुसार, संबंधित ६ जनावरांच्या चारा-पाण्याचा आणि देखभालीचा खर्च हा जवळपास ४ लाख ५० हजार रुपये इतका झाला आहे. ही संपूर्ण रक्कम गोशाळेत जमा केल्याशिवाय आरोपीला वाहनाचा ताबा मिळणे आता शक्य नाही.
या निकालामुळे जिल्ह्यात गोरक्षण कार्याला मोठा दिलासा मिळाला असून, बेकायदेशीर पशुवाहतूक करणाऱ्यांना मोठा चपराक बसली आहे. गोरक्षक व गोप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले असून “हा गोरक्षण कार्याचा मोठा विजय आहे,” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
गोशाळेच्या वतीने या प्रकरणात ॲड. राजू गुप्ता, प्राणी कल्याण अधिकारी सचिन झुंजारराव, मालवण येथील ॲड. पलाश लीलाधर चव्हाण, ॲड. कविता शर्मा, ॲड. शिवानी दुगम, ॲड. हर्षवर्धन गवाणकर यांनी यशस्वी व प्रभावी युक्तिवाद केला. तसेच या कार्यासाठी ॲड. समीर गवाणकर, ॲड. हेमेंद्र गोवेकर आणि अनिकेत गवंडी यांनी ॲड. पलाश चव्हाण यांना विशेष सहकार्य केले. मालवण येथील वकील ॲड. पलाश लीलाधर चव्हाण यांच्या गोरक्षण कार्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.












