नारायण सुर्वे यांच्या स्मारकातून त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया!

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन

हेत येथे पद्मश्री, कवीवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मारकाच्या कामाचा शुभारंभ

वैभववाडी l प्रतिनिधी :             कोकणरत्न, पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांनी आपल्या लेखणीतून समाजाला दिशा देण्याचे महान कार्य केले आहे. समाजासाठी त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. पद्मश्री नारायण सुर्वे हे आपल्या तळकोकणातील असल्याचा सार्थ अभिमान सर्वांना आहे. त्यांच्या महान कार्याची आणि विचारांची जाणीव करून देणारे भव्य स्मारक उभारून त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

हेत येथे उभारण्यात येणाऱ्या पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांच्या भव्य स्मारकाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. या स्मारकासाठी नाम. नितेश राणे यांनी दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कार्यकारी अभियंता दिनेश बागुल, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, पंचायत समिती उपसभापती साची कोलते, श्रावणी रावराणे, भाजप मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासिर काझी, भालचंद्र साठे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, तहसीलदार सूर्यकांत पाटील, प्राची तावडे, माजी महिला व बालकल्याण सभापती शारदा कांबळे, दीपक फोंडके, किशोर कांबळे, रिद्धी सुतार, देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, राजा राणे, सरपंच कांचन कांबळे, मधुकर सुर्वे, हरिश्चंद्र सुर्वे, बाळकृष्ण सुर्वे, रमाकांत सुर्वे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य आणि हेत ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, येत्या काही महिन्यांत या ठिकाणी भव्य स्मारक उभे राहील. या स्मारकात प्रशस्त सभागृह, ग्रंथालय आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नारायण सुर्वे यांचा जीवनप्रवास, त्यांनी आपल्या कवितांमधून समाजाला दिलेले संदेश आणि त्यांचे साहित्यिक व सामाजिक योगदान यांची सविस्तर माहिती या स्मारकाच्या माध्यमातून सर्वांना मिळणार आहे. त्यांचे महान कार्य आणि विचार पुढे नेण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे.

स्मारकाची उभारणी दर्जेदार पद्धतीने होईल; मात्र त्याची उभारणी झाल्यानंतर देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या ऐतिहासिक स्मारकाचे जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यास माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असल्याची घोषणाही नितेश राणे यांनी केली.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, नारायण सुर्वे यांच्या प्रत्येक शब्दातून समाजाला प्रेरणा मिळते. त्यांच्या लेखणीत प्रचंड ताकद होती. आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी समाजाला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचे कार्य केले. त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी उभारण्यात येणारे स्मारक निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.

यावेळी अजय सर्वगोड, किशोर कांबळे आणि भालचंद्र साठे यांनी मनोगत व्यक्त केले.

या भूमिपूजन प्रसंगी नारायण सुर्वे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबामधील प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. तसेच या स्मारकासाठी जमीन दिल्याबद्दल श्री खानविलकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हेत गावच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष टक्के यांनी केले, तर फोंडके सर यांनी आभार मानले.