शुभ्रा जंगम हिचे वक्तृत्वात प्रथम, निबंधात तृतीय; शौर्य मर्चंडे यानेही पटकावला प्रथम क्रमांक
खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या खेड तालुकास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेत बिजघर नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत मोठ्या गटात शुभ्रा भगवान जंगम हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. लहान गटात शौर्य मंगेश मर्चंडे याने वक्तृत्व व निबंध या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या यशात मोलाची भर घातली.
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक प्रभागातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बिजघर नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या, वक्तृत्वकौशल्याच्या आणि सर्जनशील लेखनाच्या जोरावर यश मिळवले.
मोठ्या गटातील शुभ्रा भगवान जंगम हिने वक्तृत्व स्पर्धेत ओघवत्या शैलीत विषयाची प्रभावी मांडणी करत परीक्षकांचे आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विषयाचा आशय समजून घेऊन मुद्देसूद व प्रभावीपणे विचार मांडण्याच्या तिच्या कौशल्यामुळे तिने प्रथम क्रमांक मिळवला. निबंध स्पर्धेतही तिने आपल्या लेखनकौशल्याची छाप पाडत तृतीय क्रमांक पटकावला. लहान गटातील शौर्य मंगेश मर्चंडे यानेही वक्तृत्व व निबंध या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले. त्याच्या सादरीकरणातील आत्मविश्वास, विषयाची समज आणि विचारांची मांडणी यांचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक शैलेश पराडकर, संदीप घाणेकर, विजय सकपाळ तसेच मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी केलेले मार्गदर्शन, सराव आणि प्रोत्साहन यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेत प्रभावी कामगिरी करता आली.
खेड नं. १ शाळेत पार पडलेल्या या स्पर्धेच्या आयोजनात स्पर्धाप्रमुख म्हणून केंद्रप्रमुख प्रभाकर कोळेकर, केंद्रप्रमुख राहुल जाधव, दीप्ती यादव, रविंद्र देवळेकर आणि तृप्ती म्हात्रे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्याची, भाषिक कौशल्य विकसित करण्याची आणि लेखनातील सर्जनशीलता दाखवण्याची संधी मिळाली.
बिजघर नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी गायत्री माने, खोपी विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी संदीप कंदूरकर, केंद्रप्रमुख महेंद्र जाधव, हेदली केंद्राचे केंद्रप्रमुख सदाशिव राठोड तसेच पतपेढीचे माजी संचालक संतोष उतेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही वक्तृत्व, वैचारिक अभिव्यक्ती आणि लेखनकौशल्याची मोठी क्षमता असल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे बिजघर नं. १ शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे.













