रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे येथे आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दिव्या काळे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती मूळची छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी होती. ती लोटे येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या एमईएस आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. शिक्षणासाठी ती लोटे येथे एका खासगी खोलीत भाड्याने राहत होती.
याच खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, दिव्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.













