भक्तिगीत सागर’ म्हणजे समाजाला प्रबोधनाची दिशा दाखवणारा प्रज्ञादीप : डॉ. विनय मडगावकर

मोरजीत निवृत्ती शिरोडकर यांच्या भक्तिगीत संग्रहाचे आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते प्रकाशन 

पेडणे (प्रतिनिधी) : निवृत्ती शिरोडकर यांचा ‘भक्तिगीत सागर’ हा केवळ पारंपरिक ईश्वरस्तुतीचा प्रवाह नसून मानवी मनाला आणि समाजाला नवप्रबोधनाची दिशा दाखवणारा प्रज्ञादीप आहे. भक्तीकडून सामाजिकतेकडे आणि कर्मकांडातून मानवतेकडे जाणारा त्यांचा काव्यप्रवास गोमंतकीय साहित्यविश्वात मोलाची भर घालणारा आहे, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाच्या मराठी अध्ययन शाखेचे संचालक डॉ. विनय मडगावकर यांनी केले.

 

मोरजी येथील श्री दत्तात्रय देवस्थानच्या मंडपात मोरजी सार्वजनिक श्री दुर्गा उत्सव समितीच्या सहकार्याने पत्रकार तथा साहित्यिक निवृत्ती शिरोडकर यांच्या ‘भक्तिगीत सागर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. मांद्रेचे आमदार तथा गोवा गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष जीत आरोलकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. मडगावकर बोलत होते.

 

व्यासपीठावर हणजूण सरपंच सुरेंद्र गोवेकर, पंच सदस्य दिनेश पाटील, समाजसेवक राजन कोरगावकर, मोरजी सार्वजनिक श्री दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष सागर पोंबुर्फेकर, संस्थापक अध्यक्ष सुधीर कानोईकर, नागनाथ केरकर, श्री दत्तात्रय देवस्थानचे अध्यक्ष योगेश बागकर, सचिव सतीश चारी, भक्तदास बागकर आणि लेखक निवृत्ती शिरोडकर उपस्थित होते.

 

डॉ. मडगावकर यांनी शिरोडकर यांच्या साहित्यातील सामाजिक जाणिवांचा वेध घेतला. पाषाणमूर्तीच्या पलीकडे जाऊन श्रमिकांच्या घामात ईश्वर शोधणारी पुरोगामी दृष्टी, स्त्रीशक्तीचा जागर, पर्यावरणरक्षणाची आर्त हाक आणि आत्मशुद्धीचा विचार यामुळे त्यांच्या साहित्याला सामाजिक उंची लाभली आहे, असे त्यांनी सांगितले. पारंपरिक भक्तीच्या प्रवाहातून विचार आणि विवेकाची ज्ञानज्योत तेवत ठेवणारे हे लेखन असून, त्यामध्ये समृद्ध परंपरा आणि आधुनिक प्रबोधनाचा सुंदर संगम घडतो, असेही ते म्हणाले.

 

आमदार जीत आरोलकर यांनी शिरोडकर यांच्या साहित्यसेवेचे कौतुक केले. शिरोडकर हे सिद्धहस्त लेखक असल्याचे त्यांच्या या पुस्तकातून अधोरेखित होते. पत्रकार आणि साहित्यिक आपल्या लेखणीतून समाजाला दिशा देतात. हेच कार्य त्यांनी सातत्याने केले आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या साहित्यिक आणि पत्रकारितेच्या वाटचालीत पत्नी व कन्येचा मोलाचा सहभाग असल्याचे सांगून त्यांनी शिरोडकर यांचा साहित्यप्रवास अखंड सुरू रहावा, अशा शुभेच्छा दिल्या.

 

समाजसेवक राजन कोरगावकर यांनीही शिरोडकर यांच्या साहित्यकृतीचा गौरव केला. पत्रकारितेची जबाबदारी सांभाळताना त्यांनी केलेली साहित्यसेवा समाजाला दिशादर्शक आहे. त्यांच्या साहित्याचा सुगंध गोमंतकाबाहेरही दरवळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

आपल्या मनोगतात निवृत्ती शिरोडकर यांनी पुस्तकाच्या निर्मिती मागील प्रेरणा उलगडली. जीवनाच्या विविध टप्प्यांवर आलेले अनुभव, अंतर्मनातील भक्तिभाव, मातृमायेची ऊब, देवदेवतांवरील श्रद्धा आणि गावच्या पवित्र वातावरणातून मिळालेली प्रेरणा यांतून हा संग्रह साकारल्याचे त्यांनी सांगितले.

 

सागराच्या अथांगतेप्रमाणे भक्तीही अनंत असते. तिचा तळ शोधता येत नाही आणि तिची व्याप्ती शब्दांत मोजता येत नाही. त्या भक्तिसागरातील ओंजळभर शब्दमोती गुंफून हे पुस्तक साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तो वाचकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

कु. मानसी शिरोडकर हिच्या नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुधीर कान्नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अंतरा केरकर आणि सायली कान्नाईक यांनी गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले. पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारणारे राजमोहन शेटये, सूत्रसंचालिका श्रेया भिवशेठ तसेच व्यासपीठावरील मान्यवरांना स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. श्रेया भिवशेठ हिने सूत्रसंचालन केले. श्रेया भिवशेट यांनी सादर केलेल्या पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली. सतीश च्यारी यांनी आभार मानले.