मोर्ले येथे १५ फुटी अजगराने कुत्र्यासह चार पिल्लांना गिळले; वनविभागाकडून सुरक्षित रेस्क्यू

दोडामार्ग | सुहास देसाई :मोर्ले येथील एका जनावरांच्या मांगरात (गोट्यात) शिरलेल्या तब्बल १५ फुटी अजस्त्र अजगराने एक मोठा कुत्रा आणि त्याची चार पिल्ले अशा एकूण पाच प्राण्यांना जिवंत गिळंकृत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने या अजगराला सुखरूप पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे.

मोर्ले येथील रहिवासी पंकज गवस यांच्या जनावरांच्या मांगरात एक पाळीव कुत्रा आणि तिची चार लहान पिल्ले राहत होती. रात्रीच्या वेळी १५ फुटी अजगर भक्षाच्या शोधात या मांगरात शिरला. त्याने तिथे असलेल्या मोठ्या कुत्र्यासह तिच्या चारही लहान पिल्लांना एकामागून एक गिळंकृत केले. सर्व भक्ष फस्त केल्यानंतर हा अजगर त्याच ठिकाणी सुस्त होऊन निपचित पडला होता.

सकाळी उघडकीस आला प्रकार

सकाळी नेहमीप्रमाणे पंकज गवस हे मांगराकडे गेले असता, त्यांना कुत्र्याची पिल्ले कुठेच दिसून आली नाहीत. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता, मांगराच्या एका कोपऱ्यात भला मोठा अजगर सुस्त पडलेला दिसला. त्याचे पोट प्रचंड फुगलेले असल्याने त्याने काहीतरी मोठे भक्ष गिळल्याचे स्पष्ट होत होते.

 

बघ्यांची गर्दी आणि वनविभागाची मोहीम

 

मांगरात एवढा मोठा अजगर सापडल्याची बातमी मोर्ले गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे अजगराला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी आणि बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने वनविभागाला याची माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मोलाच्या मदतीने अत्यंत शिताफीने या १५ फुटी अजस्त्र अजगराला जेरबंद केले. त्यानंतर या अजगराला मानवी वस्तीपासून दूर सुरक्षित अशा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वनविभागाच्या या तत्परतेमुळे गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.