वायरीत ठाकरे गटाला जोरदार धक्का

Google search engine
Google search engine

 

उपसरपंच निवडणुकीत भाजपच्या मदतीने काँग्रेस उमेदवाराचा विजय : ठाकरे गटाच्या उमेदवार पराभूत

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. उपसरपंच निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत उमेदवार चंदना प्रभू यांना पराभव झाला. भाजपच्या मदतीने काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सौ. प्राची पराग माणगांवकर या ६ विरुद्ध ४ मताधिक्याने उपसरपंच पदी विजयी झाल्या. आघाडीत बिघडी झाली असली तरी ठाकरे गटाला बसलेला पराभवाचा धक्का शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना असल्याची चर्चा रंगली आहे.

निवडणूक विजयानंतर काँग्रेस सोबत भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून विजयोत्सव साजरा केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या गावातील
वायरी भूतनाथ ग्रा. पं. निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस पुरस्कृत पॅनल चे सरपंच पदाचे उमेदवार भगवान लुडबे विजयी झाले होते. महाविकास आघाडीचे ५ तर भाजपचे ४ सदस्य विजयी झाले.

गुरुवारी नवनिर्वाचित सरपंच भगवान लुडबे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी उपसरपंच निवडणूक पार पडली. महाविकास आघाडीकडे बहुमत असल्याने या ग्रा. पं. वर महाविकास आघाडीचा उपसरपंच बसणार असे चित्र होते. महाविकास आघाडीच्या वतीने उपसरपंच पदासाठी शिवसेनेच्या चंदना प्रभू यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. याचवेळी भाजपच्या पाठींब्यावर काँग्रेसच्या प्राची माणगावकर यांनी उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. सरपंच व सदस्य यांनी मतदान केले. मतदानात काँग्रेसच्या प्राची माणगांवकर यांना ६ तर शिवसेनेच्या चंदना प्रभू यांना ४ मते मिळाली. सौ. माणगांवकर यांना स्वतः बरोबरच काँग्रेसच्या ममता तळगावकर आणि भाजपच्या संजय लुडबे, पांडुरंग मायनाक, विकास मसुरकर, प्रतीक्षा केळूसकर यांची मते मिळाली. तर शिवसेनेच्या प्रभू यांना स्वतः बरोबर सरपंच भगवान लुडबे, तेजस लुडबे, गौरी जोशी यांची मते मिळाली. माणगांवकर विजयी झाल्या.

यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, भाई मांजरेकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, मुन्ना झाड, संदेश तळगावकर, महेश लुडबे, बबन गावकर, गणेश सातार्डेकर, विकी लोकेगावकर, प्रतिक लुडबे, प्रथमेश गोसावी यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, आप्पा चव्हाण अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपसरपंच यांचे अभिनंदन केले.

खोबरेकर यांचा सुपडा साफ झाला : भाई मांजरेकर

मालवण किनारपट्टी भागात भाजपचा सुपडा साफ झाल्याचं वक्तव्य करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ या उपसरपंच निवडणूक निकालानंतर आली आहे. अशी प्रतिक्रिया वायरी ग्रामपंचायत निवडणूक भाजपा निवडणूक प्रभारी भाई मांजरेकर यांनी व्यक्त केली आहे. आजचा पराभव हरी खोबरेकर यांच्या मनमानी कारभाराचा पराभव आहे. त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून वायरी गावच्या मागील सरपंच, उपसरपंचांनी भाजप मध्ये प्रवेश केला. आजही त्यांच्या मनमानीपणाला कंटाळून काँग्रेसचे ग्रा. पं. सदस्य भाजपा सोबत आले आहेत. भाजपचा सुपडा साफ झाल्याचे म्हणणाऱ्या खोबरेकर यांच्या पक्षाचा त्यांच्या जि. प. मतदार संघात सुपडा साफ होण्याची वेळ आली आहे. त्यांच्या मतदार संघातील चौके, आमडोस, नांदरुख या तीन ग्रा. पं. वर गावपॅनल ची सत्ता आली आहे. तर तारकर्ली, कुंभारमाठ, घुमडे, आनंदव्हाळ या ग्रा. पं. भाजपाकडे आल्या आहेत. देवबाग ग्रा. पं. शिंदे गटाकडे गेली आहे. त्यामुळे केवळ वायरी भूतनाथ या एकाच ग्रा. पं. वर शिवसेना ठाकरे गटाचा सरपंच बसला असून येथील निवडणुकीतही हरी खोबरेकर यांच्या वॉर्डात शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा भाजपाला जास्त मते मिळाली आहेत. भगवान लुडबे हे स्वतःच्या वॉर्डातील समाज बांधवांच्या पाठींब्यावर निवडून आले असून येथील विजयाचे श्रेय शिवसेना अगर हरी खोबरेकर यांनी घेऊ नये असे भाई मांजरेकर यांनी ठणकावले आहे.