निवे बुद्रुक येथील आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात १८० विद्यार्थ्यांना मतदानाच्या ताकदीचे धडे; ‘माय भारत’चा युवा संवाद उत्साहात

‘नो युवर व्होट’ अभियानातून लोकशाही प्रक्रियेबाबत जनजागृती; युथ आयकॉन कमलेश सोनवणे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

देवरूख (प्रतिनिधी)

लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी तरुणाईमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘माय भारत रत्नागिरी’च्या वतीने संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथील आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे १८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मतदानाचा अधिकार आणि त्यामागील जबाबदारी समजून घेतली.

‘नो युवर व्होट’ या संकल्पनेवर आधारित संवादात युथ आयकॉन कमलेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एका मतामुळे लोकशाही प्रक्रियेत किती मोठा बदल घडू शकतो, तसेच देशाच्या विकासात जागरूक मतदारांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांतून स्पष्ट केले. ‘एसआयआर’ या विषयाचीही माहिती त्यांनी दिली. २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत देशातील ५०० जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नवी दिल्ली येथील माय भारत कार्यालयाकडून या संवादासाठी सोनवणे यांची विशेष नियुक्ती करण्यात आली होती. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाच्या अधिकारासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले. सोनवणे यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. जागरूक आणि जबाबदार नागरिक बनून देशाच्या उभारणीत योगदान द्यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.