वेरवली खुर्द ग्रामस्थांची मागणी, पोलिस, तहसीलदार यांना निवेदन
लांजा (प्रतिनिधी) वेरवली गावात यापूर्वी घडलेल्या संशयास्पद मृत्यू, दागिने चोरी, व इतर चोरी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी वेरवली खुर्द ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन आज शुक्रवारी लांजा, पोलिस तसेच तहसीलदार यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, वेरवली बुद्रुक येथील वैशाली हेगिष्टे यांच्या हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण वेरवली खुर्द पडवण गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या घटनेची तसेच यापूर्वी घडलेल्या संशयास्पद मृत्यू तसेच चोरीच्या घटनांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
वैशाली हेगिष्टे या वृद्ध महिलेच्या हत्येच्या घटनेनंतर लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. या घटने प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून संबंधित आरोपीला ताब्यात घेतले असले तरी अद्यापही लोक भीतीच्या छायेत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही मागण्या या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
यामध्ये जून २०२२ मध्ये नम्रता लाड वेरवली खुर्द यांच्या घरी अंगावरील सोन्याच्या दागिने चोरीला गेले होते व त्या मृत अवस्थेत आढळल्या होत्या. त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे. मारुती साळस्कर वेरवली खुर्द कातळवाडी यांच्या राहत्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. ऑक्टोबर २०२६ मध्ये दिनकर बाणे -वेरवली खुर्द यांची पत्नी सौ सरिता बाणे यांचे दुचाकी स्वाराने भरदिवसा मंगळसूत्र ओढून नेले होते. सन ३०२१-२२ मध्ये वेरवली खुर्द येथील ग्रामदैवत मंदिरातील घंटा चोरीला गेली होती. मौजे वेरवली खुर्द आगरवाडी येथील गणपती मंदिरातील दानपेटी फोडली गेली होती. विजय खेडेकर वेरवली खुर्द यांच्या बंद घरातील वस्तू चोरीला गेल्या आहेत.
त्यामुळे या सर्व घटनांची पुन्हा एकदा सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी तसेच. वैशाली हेगिष्टे यांच्या हत्येच्या प्रकरणात आणखी कोणी सहभागी असल्यास त्यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना निवेदन सादर करताना चंद्रकांत मांडवकर, अरुण डोळे, सुनील खुलम, सौ साक्षी चव्हाण, मारुती साळस्कर, विजय पांचाळ, रवींद्र शिंदे आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.










