डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयातील मुख्य लिपिक राजेंद्र विचारे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम

चिपळूण (प्रतिनिधी) : मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ.तात्यासाहेब नवतुकाला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय, मार्गताम्हणे येथील मुख्य लिपिक राजेंद्र तातोजी विचारे आपल्या ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले.
सेवाभावी निवृत्ती बाबत आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष व माजी आमदार मधुकर चव्हाण, उपाध्यक्ष अजित साळवी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ.बाळासाहेब यादव, माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊ लकेश्री, प्राध्यापक, विद्यार्थी, परिसरातील नागरिक तसेच चिपळूण तालुक्यातील विविध महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीउपस्थित होते. राजेंद्र विचारे यांनी डॉ .तात्यासाहेब नातू महाविद्यालयाच्या स्थापनेपासून महाविद्यालयाची प्रामाणिकपणे सेवा केली. मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाची सर्व कार्यालयीन पत्रे व डॉ.तात्यासाहेब नातू महाविद्यालय यामध्ये महत्त्वाचा दुवा साधत त्यांनी ३३ वर्षे अविरत सेवा केली. दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले आहेत. स्वर्गीय रुक्मिणी गणपतराव चव्हाण सभागृहात राजेंद्र विचारे यांच्या सेवानिवृत्तीचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला. मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी मुख्य लिपिक राजेंद्र विचारे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या मृदू स्वभावाबद्दल व एकंदरीत कार्य कर्तृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले. राजेंद्र विचारे यांनी आपल्या शांत व प्रामाणिक स्वभावाच्या माध्यमातून महाविद्यालयाची जी सेवा केली आहे याबद्दल त्यांनी कौतुक केले. त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांनी सेवाभावी वृत्ती अशीच कायम ठेवावी, असा मनोदय व्यक्त केला. संस्थेचे सचिव मोहन चव्हाण यांनी राजेंद्र विचारे यांच्या हसऱ्या व मनमिळाऊ स्वभावाचे कौतुक करीत त्यांच्या कष्टाळू गुणांबद्दल माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव यांनी कार्यालयीन अधीक्षक व मुख्य लिपिक राजेंद्र विचारे यांच्या स्वभावाचे अनेक पैलू सांगितले. मुंबई विद्यापीठामार्फत महाविद्यालयाला आंतरराज्य महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा घेण्याचा बहुमान मिळाला होता. त्यावेळी कार्यालयीन अधीक्षक व मुख्य लिपिक राजेंद्र विचारे यांच्या मोलाच्या भूमिकेबद्दलचे विशेष कौतुक केले. राजू विचारे यांच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ संगीता काटकर यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आज त्याचे वटवृक्षात झालेले रूपांतर या सर्व महाविद्यालयाच्या जडणघडणीत मुख्य लिपिक राजेंद्र विचारे यांच्या मोलाच्या कार्याची माहिती दिली. परिसरातील नागरिकांनीही राजेंद्र विचारे यांच्या कार्याचे कौतुक केले. मुख्य लिपिक राजेंद्र विचारे यांच्या परिवारातील सदस्यांनीही मनोगत व्यक्त केले. डीबीजे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त रजिस्टर यांनीही राजेंद्र विचारे यांच्या कार्याचा गौरव केला. संस्थेचे उपाध्यक्ष अजित साळवी यांनी राजेंद्र विचारे यांच्या मेहनती स्वभावाबद्दल माहिती दिली. पाटपन्हाळे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांनीही राजेंद्र विचारे यांच्या कार्याचा गौरव केला. मुख्य लिपिक राजेंद्र विचारे यांनी आपल्या मनोगतात संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी व परिसरातील नागरिक यांच्या अनमोल सहकार्याबद्दल आभार व्यक्त करीत आपल्या सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक व कोकण विकासामध्ये अनमोल योगदान देण्याबद्दल आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विक्रांत टेरवकर यांनी तर आभार प्राध्यापिका अन्वी निकम यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.