कै. नंदू शिरोडकर यांना शिवसेनेतर्फे श्रद्धांजली : स्मृतींना उजाळा
सावंतवाडी: शिवसेना पक्षासाठी तळमळीने काम करणारे आणि सर्वांसोबत हसतमुखपणे वागणारे प्रसन्न उर्फ नंदू शिरोडकर यांच्या अकाली निधनाने मनाला खूप दुःख झाले आहे, असे मत शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केले. त्यांच्या निधनाने पक्षाने एका झटणाऱ्या कार्यकर्त्याला गमावले आहे, अशा शब्दांत परब यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
येथील माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे खासगी स्वीय सहाय्यक असलेले नंदू शिरोडकर यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यांच्या अकाली निधनाने शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात आली होती. आज आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी शिंदे शिवसेनेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब बोलत होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत, अशोक दळवी, महिला शहर प्रमुख भारती मोरे आदी उपस्थित होते.
संजू परब म्हणाले की, शिंदे शिवसेनेमध्ये कार्यरत झाल्यापासून त्यांनी नंदू शिरोडकर यांचे काम पाहिले आहे. पक्षासाठी नेहमी तळमळणारे, सर्वांशी आदराने वागणारे अशी त्यांची ओळख होती. सरळ आणि साधे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पक्षाबरोबरच दीपक केसरकर यांना मानणारे त्यांचे खंदे समर्थक म्हणूनही ते परिचित होते. त्यांच्या अशा अकाली एक्झिटमुळे आम्ही एका सच्चा कार्यकर्त्याला गमावले असून, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. त्यांच्या कुटुंबीयांच्या सोबत आम्ही सदैव राहू.
अशोक दळवी म्हणाले की, नंदू शिरोडकर यांनी व्यापार व्यवसायासोबतच समाजकारणही अंगीकारले होते. आमदार दीपक केसरकर यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. त्यांचे व्यक्तिमत्व समाजासाठी पोषक होते आणि ते सर्वांशी आदराने वागत होते. त्यांच्या अकाली निधनाने आम्हा सर्वांना अतिव दुःख झाले आहे. पक्षाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये तळमळीने पुढे असणारे नंदू आता आम्हाला दिसणार नाहीत, हे विचार करूनच खूप दुःख होते. त्यांची आठवण आमच्या सदैव स्मरणात राहील.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, विश्वास घाग, मीरा सिंग, पूजा नाईक, शर्वरी धारगळकर, दिपाली सावंत, अर्चित पोकळे, आबा केसरकर, सुरेश शिरोडकर, नरेंद्र मिठबावकर, शिल्पा मेस्त्री, महादेव राऊत, वैशाली सुभेदार, दादा राऊळ, दत्ता सावंत, गजा सावंत, सुमित कोरगावकर, लक्ष्मण भालेकर, प्रशांत साठेलकर, समीर पालव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
*कै.गिरीश नाटेकर यांनाही श्रद्धांजली*
शिवसेना पक्षाचे बांदा शहर प्रमुख गिरीश नाटेकर यांचेही नुकतेच निधन झाले आहे. कै. नाटेकर यांनीही पक्षासाठी तळमळीने काम केले आहे. आजच्या या कार्यक्रमात पक्षाच्या माध्यमातून त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.












