देवरूखच्या सोने व्यावसायिक धनंजय केतकर अपहरण : लुटप्रकरणी चौघांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

देवरूख (प्रतिनिधी)

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील सोने व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण व लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या चार आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी देवरूख न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोने व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण व लुटीप्रकरणी देवरूख पोलीसांनी सापळा रचून आणखी चार आरोपींना ताब्यात घेतले होते. यामध्ये महेश राया मोरे व तेजस रघुनाथ तांडेल यांना कल्याणमधून तर दशरथ मारूती साळुंखे याला नवीमुंबई येथून व सचिन हरिभाऊ खुडे याला बारामती येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी पोलीसांनी जप्त केली आहे. त्यांना देवरूख न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी या चौघांची पोलीस कोठडी संपल्यावर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १६ आँक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.