कुशेवाडा ग्रामपंचायत येथे महाआरोग्य शिबीर संपन्न…

ग्रा.पं. कुशेवाडा व आयुष्यमान आरोग्य केंद्र परुळे यांचे आयोजन

परुळे : प्रतिनिधी

ग्रामपंचायत कुशेवाडा व आयुष्यमान आरोग्य केंद्र परुळे यांच्या सहकार्याने महाआरोग्य शिबीर ग्रामपंचायत कुशेवाडा येथे मेडिकल कॉलेज ओरोसच्या नामांकित डॉक्टर यांच्या रुग्ण तपासणीने गुरुवारी संपन्न झाले. महाआरोग्य शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्या सौ. यज्ञा साळगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला.

यावेळी कुशेवाडा ग्रामपंचायत सरपंच श्री. निलेश सामंत, उपसरपंच श्री. महादेव सापळे, ग्रामपंचायत सदस्य श्री. गणपत माधव, श्री. विठोबा राणे, सौ. प्राजक्ता देसाई, सौ. वैभवी माडये, सौ. प्राजक्ता कदम, श्री. सिद्धेश माडये, सौ. रोहिणी परब, सौ. श्रुतिका केसरकर माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. प्रकाश राणे, कुशेवाडा/रावदस पोलीस पाटील श्री. प्रियदर्शी कदम, आशा स्वयंसेविका सौ. साक्षी राऊळ आणि सौ. साधना परुळेकर तसेच अंगणवाडी सेविका सौ. गीतांजली माधव, श्रीम. प्रज्ञा राणे, सौ. मयुरी राणे सौ. पार्सेकर आणि सौ. सुजाता माधव तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर मिश्रा व प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी यांची उपस्थिती होती. सोबत शिक्षकवर्ग, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

मांझ गांव आरोग्य संपन्न गांव अभियाना अंतर्गत महाआरोग्य शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय व महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे डॉ. सुनिल शहारे, बालरोगशास्त्र विभागाचे डॉ. काजल वाघ व डॉ. विशाल खरमटे तसेच औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. मारोती हामंद इ. स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या उपस्थितीत कुशेवाडा गावातील १७४ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात प्राथमिक शाळेचे व अंगणवाडीतील सर्व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार व आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. त्यामुळे गावातील रुग्णांना एकाच ठिकाणी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला घेण्याची सुविधा उपलब्ध झाली.

शिबिराचे यशस्वी आयोजन कुशेवाडा गावचे सरपंच श्री. निलेश सामंत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर मिश्रा यांच्या पुढाकारातून करण्यात आले.