बॉम्बशोधक पथकाची न्यायालयात कसून तपासणी ; धमकीचा ई-मेल ठरला अफवा
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
राज्यभरातील न्यायालय उडवून देण्याची धमकीवजा ई-मेल प्राप्त झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. याच प्रकारचा ई-मेल सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयालाही प्राप्त झाल्याने न्यायालय प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. मात्र, बॉम्बशोधक पथकाने केलेल्या कसून तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्ब आढळून आला नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयातील बॉम्बची धमकी अखेर अफवाच ठरली. सोमवारी दुपारी तीन वाजता ही धडकी भरणारी मोहीम सिंधुदुर्ग पोलिसांनी जिल्हा न्यायालय परिसरात राबवत तपासणी केली.
न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू असतानाच हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. जिल्हा पोलीस दलाचे बॉम्बशोधक पथक तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ न्यायालय परिसरात दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायाधीश, अधिकारी, कर्मचारी, वकील आणि न्यायालयात आलेल्या नागरिकांना इमारतीबाहेर काढण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस दल डॉग कॉड सह बॉम्बशोधक पथक न्यायालय इमारतीत पाच ते दहा मिनिटात शिरले. व ही तपास मोहीम राबवली.
त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण न्यायालयीन इमारतीची कसून तपासणी केली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा बॉम्ब आढळून आला नाही. त्यामुळे संभाव्य घातपाताचा धोका नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांना पुन्हा न्यायालयीन इमारतीत प्रवेश देण्यात आला.
धमकीचा संदेश अखेर अफवा ठरला असला, तरी या प्रकारामुळे काही काळ न्यायालय प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.













