ग्रामिण रुग्णालयाच्या आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य

गटाराचे चेंबर फुटल्याने दुर्गंर्धी वर्ग डासांचा प्रादुर्भाव प्रशासनाच्या परिसर स्वच्छतेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

मंडणगड प्रतिनिधी : भिंगळोली येथील ग्रामिण रुग्णालयाच्या आवारात अनेक दिवसांपासून इमारत परिसरात गटाराचे फुटलेल्या चंबरमुळे अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गटाराची दुर्गंर्धी व डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णालय प्रशासनाच्या परिसर स्वच्छतेच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्रामिण भागातील गोरगरीब रुग्णांना उपचार मिळावेत आणि त्यांचे आरोग्य सुधारावे, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या भिंगळोली येथे सुरु असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातच अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दुःखद म्हणावे असे आहे. रुग्णालयाच्या परिसरातील गटाराचे चेंबर फुटलेल्या अवस्थेत असून, त्यातून बाहेर पडणारे दूषित पाणी परिसरात साचत आहे. त्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयाच्या अगदी जवळच गटाराचे चेंबर फुटल्याने सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे. या साचलेल्या दूषित पाण्यामुळे परिसरात डासांची पैदास होण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच असह्य दुर्गंधीमुळे रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे आरोग्य विभागाकडून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या पाणी व अस्वस्थेपासून निर्माण होणाऱ्या साथीचे आजारांपासून बचाव करण्यासाठी स्वच्छता आणि डास प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती केली जाते. मात्र, दुसरीकडे शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातच अशा प्रकारची अस्वच्छता आढळून येणे ही गंभीर बाब आहे. उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अशा दूषित वातावरणाचा सामना करावा लागत असेल, तर आरोग्य यंत्रणेच्या स्वच्छता व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.रुग्णालयाच्या आवारातील अस्वच्छता दूर करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? फुटलेले चेंबर तातडीने दुरुस्त करून सांडपाण्याचा योग्य निचरा करावा, परिसराची स्वच्छता करावी तसेच डास प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रुग्णालय हे आरोग्यसेवेचे केंद्र असताना त्याच परिसरात अस्वच्छतेमुळे आरोग्याला धोका निर्माण होणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे. आता संबंधित आरोग्य प्रशासन आणि जबाबदार यंत्रणा या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आरोग्य मंत्र्याच्या ओ.सी.डी. ने या रुग्णालयास नुकतीच भेट देऊन परिसर पाहणी करुन येथील समस्यांचा अभ्यास केल्याने त्यांच्या दौऱ्यानंतर तरी परिस्थितीत सुधाराची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.