जनजाती गौरव दिवस सप्ताहानिमित्त मंडणगड तालुक्यात स्वच्छता मोहीम व दीप महोत्सव उत्साहात साजरा

मंडणगड प्रतिनिधी : जनजाती गौरव दिवस सप्ताहाचे औचित्य साधून रत्नागिरी सर्वसाधारण समितीच्यावतीने मंडणगड तालुक्यातील वेरळ आणि लाटवण आदिवासी वाडी येथे स्वच्छता मोहीम, दीप महोत्सव आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागातून हे सर्व उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाले.
या उपक्रमाची सुरुवात वेरळ येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून करण्यात आली. या वेळी परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. त्यानंतर लाटवण आदिवासी वाडी येथील समाजमंदिराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
दीप महोत्सव आणि योजनांची जनजागृती
सायंकाळी लाटवण आदिवासी वाडीमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात दीप महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने उपस्थित आदिवासी बांधवांना जनजाती गौरव सप्ताहाचे महत्त्व सांगत आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि परंपरांची माहिती देण्यात आली.
तसेच, आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, शैक्षणिक सुविधा आणि विकासात्मक उपक्रमांबाबत उपस्थितांचे प्रबोधन करण्यात आले. हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी नोडल अधिकारी आणि सर्व सहकारी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.