कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुरक्षित वापराबाबत केले मार्गदर्शन
चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे जपानमधील मुसाशिनो विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. यासुहिरो हयाशी यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील शैक्षणिक संधी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यालयातील भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण, अभ्यासक्रम, विद्यार्थी संख्या तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधा व उपक्रमांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले.
विद्यालयाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले शैक्षणिक व्यासपीठ आणि आधुनिक सुविधा त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. याप्रसंगी प्रा. हयाशी यांनी जपानमधील आणि भारतीय शिक्षणपद्धतीतील वैशिष्ट्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व स्पष्ट करताना शालेय जीवनात AI चा प्रभावी आणि योग्य वापर कसा करावा, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. AI चा वापर करताना माहितीची सत्यता पडताळणे, वैयक्तिक माहितीची गोपनीयता राखणे तसेच तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून न राहता स्वतःच्या विचारशक्तीचा विकास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणारे नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवनिर्मिती करणारे विद्यार्थी घडले पाहिजेत, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला. या संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षणपद्धती आणि भविष्यातील करिअरच्या संधी यासंदर्भात विविध प्रश्न विचारले. प्रा. हयाशी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यामुळे हा संवाद विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरला. प्रा. यासुहिरो हयाशी यांची शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील कारकीर्द उल्लेखनीय आहे.
त्यांनी जपानमधील केईओ विद्यापीठातून मार्च २००२ मध्ये पदवी (B.S.), मार्च २००४ मध्ये मीडिया अँड गव्हर्नन्स विषयातील पदव्युत्तर पदवी (M.S.) आणि मार्च २०११ मध्ये पीएच.डी. संपादन केली आहे. सध्या ते मुसाशिनो विद्यापीठाच्या डेटा सायन्स विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच एशिया एआय इन्स्टिट्यूट येथे संशोधक आणि केईओ विद्यापीठाच्या एसएफसी येथे वरिष्ठ संशोधन अधिछात्र म्हणूनही कार्यरत आहेत. शैक्षणिक तंत्रज्ञान, डेटाबेस प्रणाली, डेटा मायनिंग, अध्ययन सहाय्यक प्रणाली आणि सिमॅंटिक कम्प्युटिंग ही त्यांच्या संशोधनाची प्रमुख क्षेत्रे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञाशी थेट संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा, संशोधनवृत्ती आणि नवनवीन संधींचा शोध घेण्याची प्रेरणा निर्माण झाली. विद्यालयासाठी ही भेट निश्चितच अविस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरली.













