दापोलीत बंदिस्त घराचे कुलूप तोडून पावणेदोन लाखांचा ऐवज चोरीस; दापोली पोलिसांत गुन्हा दाखल

दापोली (प्रतिनिधी):
दापोली तालुक्यातील अडखळ जुईकर मोहल्ला येथे एका बंदिस्त घराला लक्ष करत अज्ञात चोरट्यांनी घरातील बेडमधील कप्पा उघडून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण १,६६,०००/- रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. फैरोजा अब्दुल रहिम वाकणकर (वय ५७, रा. अडखळ जुईकर मोहल्ला, ता. दापोली, जि. रत्नागिरी) या दापोलीतील आपल्या राहत्या घरी असताना, त्यांच्या घरातील बेडरुममधील लाकडी बेडच्या कप्प्यात सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवलेली होती. दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी १७:०० वाजण्याच्या दरम्याने फिर्यादीने पाहणी केली असता, बेडचा कप्पा उघडून त्यातील ऐवज गायब असल्याचे दिसून आले.
अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने घरातील बेडरुममधील बेडचा कप्पा उघडून घरातून रोख १६,०००/- रुपये रोख रक्कम, ३ ग्रॅम वजनाची लहान मुलांची एक सोन्याची चैन, ४ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे जोड, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दोन फुलांचे जोड, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले दोन जोड, ५ ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी, लहान मुलींच्या मापाच्या प्रत्येकी १ ग्रॅम वजनाच्या ६ सोन्याच्या अंगठ्या, प्रत्येकी १ ग्रॅम वजनाची तीन सोन्याची बिस्कीटे आणि ५ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे पान असा एकूण १,६६,०००/- रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज व रोख रक्कम चोरून नेली आहे.
सदर दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याने फिर्यादी प्रचंड घाबरून गेल्या होत्या, त्यामुळे त्यांनी नातेवाईकांशी चर्चा करून 17 नोव्हेंबर रोजी विलंबाने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.