खेडशीत किरणा दुकानदारावर प्राणघातक हल्ला; उधारीच्या पैशांवरून डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरी शहर हद्दीतील खेडशी नाका येथे किराणा सामान आणि मागील उधारीच्या पैशांच्या कारणावरून एका ग्राहकाने दुकानदारावर लोखंडी सळई व चिऱ्याच्या दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी भीमसिंह भवरसिंह पुरोहित (वय ४२, रा. कारवांचीवाडी, खेडशी) यांचे खेडशी नाका येथे ‘श्री सरस्वती सुपर मार्केट’ नावाचे किराणा दुकान आहे. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३:२१ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी रमेश चंद्रकांत खेत्री (वय ३८, रा. खेडशी, कारवांचीवाडी) हा त्यांच्या दुकानात किराणा सामान खरेदी करण्यासाठी आला होता.
त्यावेळी दुकानदाराने सामानाचे पैसे आणि मागील उधारीची विचारणा केली असता, याचा राग आल्याने आरोपीने दुकानदाराला शिवीगाळ केली. तसेच दुकानाजवळ पडलेल्या लोखंडी सळईने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या खांद्यावर जोरात मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, फिर्यादीचा जीव घेण्याच्या उद्देशाने आरोपीने दुकानाशेजारी पडलेला चिऱ्याचा दगड उचलून थेट त्यांच्या डोक्यात घातला, यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी जखमी दुकानदार भीमसिंह पुरोहित यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रमेश चंद्रकांत खेत्री याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ च्या कलम १०९(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.