मुंडे महाविद्यालयत ‘पंडित नेहरू व बिरसा मुंडा’ यांची जयंती साजरी

मंडणगड (प्रतिनिधी) : लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘पंडित नेहरू व बिरसा मुंडा’ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दगडू जगताप होते. यावेळी प्राणिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. शैलेश भैसारे, बाबासाहेब पाटील, रोशन पिचूर्ले, सचिन थोरे, अरुण घोडेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी प्राचार्य डॉ. दगडू जगताप व डॉ. शैलेश भैसारे यांच्या हस्ते ‘पंडित नेहरू व बिरसा मुंडा’ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी बाबासाहेब पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी डॉ. शैलेश भैसारे यांनी सांगितले की, भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणूनही साजरा करण्यात येतो. आजच्या दिवसी आपण देशातील अनेक स्वातंत्र्यवीरांना स्मरण करतो, पण ज्या तरुण वयात बिरसा मुंडा यांनी इंग्रजशाहीविरुद्ध शिंग फुंकले, तो इतिहास आपल्या प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे. आदिवासी समाजात स्वाभिमानाची ज्योत पेटवन्याचे महान कार्य त्यांनी केले. म्हणून आजही त्यांचे कार्य व जीवनप्रवास प्रेरणादायी व आदर्शत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श आपल्या डोळयासमोर ठेवावा असे सांगितले.
प्रभारी प्राचार्य म्हणून बोलताना डॉ. दगडू जगताप यांनी सांगितले की, आज १४ नोव्हेंबर म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच जन्मदिवस होय. लहान मुलांवरील त्यांच्या अपार प्रेमामुळे हा दिवस संपूर्ण देशभरात ‘बालदिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले असून अनेकदा तुरुंगवासही भोगला आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत, विज्ञान, शिक्षण आणि औद्योगिकीकरणाचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे सांगून त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.
कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार रोशन पिचूर्ले यांनी मानले.