
राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील शंभु ग्रुप प्रतिष्ठान ओझर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भातलावणी व नांगरणी स्पर्धेत येथील राजंगा फार्मर प्रोडयुसर कंपनीने शहरी विभागातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
ओझर साबळेवाडी येथील भटाचा माळ येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडला. शहरी आणि ग्रामिण अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शहरी विभागात ३१ तर ग्रामिण विभागात ३४ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
शहरी विभागातून राजंगा फार्मर प्रोडयुसर कंपनीने सहभाग घेतला होता. कंपनीच्या पाखऱ्या व बावऱ्या या जोडीने हे सुयश संपादन केले. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाबद्दल रोख रूपये सात हजार व पाच फुटी भव्य ढाल देवून सन्मानित करण्यात आले.
या ठिकाणी जाऊन या स्पर्धेमध्ये सहभागी होणे आणि जिंकणे हे लक्ष नसून तालुक्यातील शेतकऱ्यांना नवचेताना देणारे तसेच पशुधन ही काळाची गरज आहे व यासाठी मनोरंजनाच्या बरोबर पशुधन आवड जोपासली जावी यामुळे शेतीमध्ये अमुलाग्रा बद्दल घडतील या उद्देशाने या स्पर्धेत सहभाग घेतल्याचे राजंगा कंपनीचे अध्यक्ष गोपाळ गोंडाळ यांनी सांगितले. कंपनीने मिळविलेल्या यशाबद्दल कंपनीचे सभासद व शेतकऱ्यांतून अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी कंपनीचे सभासद सौ. अमरे, संतोष राघव आदी उपस्थीत होते.
—











