मिरजोळे येथे वनराई बंधारा बांधकाम उपक्रम उत्साहात संपन्न

रत्नागिरी :
जलसंधारणाच्या उद्देशाने क्रेडाई रत्नागिरी, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आणि ग्रामपंचायत मिरजोळे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी मिरजोळे येथील पाटीलवाडी, ब्रिजजवळ वनराई बंधारा बांधकाम उपक्रम राबविण्यात आला.

क्रेडाई रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. महेश गुंदेचा, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. सुमित ओसवाल आणि मिरजोळे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. रत्नदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.

पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत साठा वाढविणे, भूजल पातळी टिकवून ठेवणे तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या वनराई बंधारा बांधकामासाठी आवश्यक असलेल्या रिकाम्या सिमेंटच्या गोण्या क्रेडाई रत्नागिरीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या गोण्यांचा उपयोग वनराई बंधारा बांधकामासाठी करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी क्रेडाई रत्नागिरीचे पदाधिकारी व सदस्य, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामपंचायत मिरजोळेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सर्व संबंधित संस्था व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून आणि श्रमदानातून वनराई बंधारा बांधकाम उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.