खेडमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच; दोन घरफोड्यांत पावणेआठ लाखांचा ऐवज लंपास

खेड (रत्नागिरी) : खेड तालुक्यातील आंबडस खोतवाडी आणि शिव बुद्रुक मोहल्ला येथे घरफोडीच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या असून, अज्ञात चोरट्यांनी दोन्ही ठिकाणांहून रोख रकमेसह एकूण ७ लाख ८२ हजार २५० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या दोन्ही प्रकरणांप्रकरणी २२ नोव्हेंबर रोजी खेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, आंबडस खोतवाडी येथील अशोक रघुनाथ जाधव (वय ५८) यांचे घर १३ नोव्हेंबर रोजी रात्री ७:०० ते २० नोव्हेंबर रोजी दुपारी १२:४५ वाजेपर्यंत बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे लॉक आणि कोयंडा कोणत्यातरी हत्याराने कापून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून २० हजार रुपये रोख रक्कम तसेच सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
दुसरी घटना शिव बुद्रुक मोहल्ला येथे २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:४० वाजण्यापूर्वी घडली. येथील रहिवासी अहमद महम्मद परकार (वय ५६) यांच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांच्या घराचे मुख्य दरवाजाचे लॉक व कोयंडा कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटातून ५ हजार रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने, तीन इन्व्हर्टर बॅटरी, एक गॅस सिलेंडर आणि तांबे-ॲल्युमिनिअमची भांडी असा एकूण १ लाख ४२ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.
खेड पोलिसांनी दोन्ही घटनांप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे नोंदवले असून, पुढील तपास सुरू आहे.