खेड (प्रतिनिधी) : त्रिपुर पौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त खेड शहरातील जगबुडी नदीकिनारी असलेल्या विसर्जन घाटावर एक हजार पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. पणत्यांच्या प्रकाशाने संपूर्ण नदीकिनारा उजळून निघाला आणि परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यावेळी खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष माधवी राजेश बुटला यांच्या हस्ते जगबुडी नदीचे जलपूजन करण्यात आले.
त्रिपुर पौर्णिमेनिमित्त आयोजित या कार्यक्रमात खेड शहरातील नागरिकांसह नगरपालिकेचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नदीकिनारी एक हजार पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. या प्रकाशमय वातावरणात नदीचे पूजन करून निसर्ग, जलसंपत्ती आणि नदीच्या महत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी महायुती सरकारने हाती घेतलेल्या नदीजोडो अभियानाला यश मिळावे, राज्यावर असलेले दुष्काळाचे सावट दूर व्हावे आणि महाराष्ट्रातील जनतेला पाण्याची मुबलक उपलब्धता व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली. नदीदेवतेला गाऱ्हाणे घालून राज्यातील शेतकरी, नागरिक आणि सर्वसामान्य जनतेला पाणीटंचाईच्या संकटातून दिलासा मिळावा, अशी मनोकामना व्यक्त करण्यात आली.
त्रिपुर पौर्णिमेच्या धार्मिक महत्त्वाबरोबरच जलसंवर्धनाचा संदेश देणारा हा दीपोत्सव नागरिकांच्या सहभागातून उत्साहात पार पडला. जगबुडी नदीकिनारी पणत्यांच्या प्रकाशात झालेल्या जलपूजनामुळे विसर्जन घाटाचे दृश्य आकर्षक बनले होते. धार्मिक श्रद्धा, सामूहिक सहभाग आणि जलसंपत्तीच्या संवर्धनाची भावना यांचा संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.












