ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावचे जागृत देवस्थान सातेरी रवळनाथ पंचायतनाचा वार्षिक जत्रौत्सव सुरु असून मंदिरात त्रिपुरा पौर्णिमेच्या पहिल्या जत्रेपासून रविवारी २९ नोव्हेंबर च्या दुसऱ्या जत्रेपर्यंत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरु असून. गावठणवाडी मित्रमंडळाकडून यावर्षी दशावतार थीम घेत जत्रौत्सवानिमित्त साकारण्यात आलेला दशावतार देखावा सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. ओटवणे जत्रौत्सवात दरवर्षी गावठणवाडी कला क्रीडा मंडळ आणि सहकारी यांच्या वतीने ओटवणे नगारखाना परिसरात देखावा उभारला जातो यावर्षी मात्र मंडळाकडून एक वेगळी थीम आणली गेली आहे.ओटवणे गाव ही दशावतारांची खाण म्हटली जाते या गावाने दशावतारला अनेक रत्ने दिलीत,ज्यांनी दशावतार कला साता समुद्रापार नेली या कलेच्या वाढीस हातभार लावला.गावठणवाडी मित्रमंडळ, आतुरता ग्रुप नेहमीच दशावतार नाटकांचे आयोजन करत या कलेला,कलाकारांना प्रोत्साहन देत असतात.यावेळी मात्र जत्रेच्या निमित्ताने त्यांनी या दशावतार देखाव्यातून या कलेवरील एक वेगळं प्रेम दाखविले आहे. दशावतार देखावा करून दशावतार कलाकारांबरोबर या कलेला मानवंदना देण्याचा प्रयत्न केला आहे .हा देखावा मंदिरामध्ये जत्रौत्सवासाठी येणाऱ्या भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
त्यांच्या देखाव्याचे ग्रामस्थ, भाविक,दशावतार कलावंत यांच्याकडून कौतुक होत आहे.












