गोगटे महाविद्यालयात स्पर्धा
इतिहास शोध बोध मंडळातर्फे आयोजन
दामले विद्यालय द्वितीय, नानल गुरुकुल तृतीय
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तसेच इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळातर्फे आयोजित अतुल्य भारत प्रश्नमंजुषा स्पर्धा आज उत्साहात आणि चुरशीच्या वातावरणात पार पडली. या स्पर्धेत फाटक हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला, तर दामले विद्यालय द्वितीय आणि ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुल तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
स्पर्धेत रत्नागिरीतील ९ शाळांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात आणि ऐतिहासिक दृष्टिकोनात भर घालणाऱ्या एकूण सात रंजक फेऱ्या या स्पर्धेत पार पडल्या. स्पर्धेचे संचालन अनय जोशी आणि किर्ती जोगळेकर यांनी केले.
बक्षीस वितरण समारंभात विजयी स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवले. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना पुस्तके देऊन सन्मानित केले. याप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी, डॉ. पंकज घाटे, स्पर्धा समन्वयक निनाद तेंडुलकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक स्पर्धा समन्वयक निनाद तेंडुलकर यांनी केले. फाटक हायस्कूलच्या तपस्या बोरकर हिने आणि शिक्षक प्रशांत मांडवकर यांनी मनोगत व्यक्त करत स्पर्धेच्या दर्जेदार नियोजनाचे कौतुक केले. संयोजक चमूमधून डॉ. पंकज घाटे यांनी स्पर्धेमागील भूमिका स्पष्ट केली. अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. सुनील गोसावी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केला. सूत्रसंचालन सानिका पांचाळ हिने केले, तर आभार सौ. अन्वी कोळंबेकर यांनी मानले.
स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी निनाद तेंडुलकर, डॉ. पंकज घाटे, दत्तात्रय माळवदे, आदेश मुकणे, सौ. अन्वी कोळंबेकर, माधवी लेले आणि प्रा. मधुरा चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. इतिहास शोध आणि बोध मंडळाचे सदस्य विद्यार्थी यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवक म्हणून मोलाचे योगदान दिले.













