दशावतार लोककलेतून वन्यजीव संरक्षणाचा संदेश; पाच शाळांमध्ये जनजागृती
स्वप्निल कदम -कुडाळ :
निसर्ग, पर्यावरण आणि वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने कुडाळ वनपरिक्षेत्रात २ ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘वन्यजीव सप्ताह २०२६’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी ‘अधिवासांना जोडणे, वन्यजीवांना समृद्ध करणे’ (Connecting Habitats, Thriving Wildlife) या संकल्पनेवर भर देत विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.
वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी श्री हेरंब पारंपरिक दशावतार लोककला नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग आणि कुडाळ वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक दशावतार लोककलेच्या माध्यमातून वन्यजीवांचे महत्त्व, त्यांच्या संरक्षणाची गरज आणि नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला.
चौके, कुडाळ, पाठ, वेंगुर्ला आणि माणगाव येथील पाच शाळांमध्ये हे उपक्रम राबविण्यात आले. पारंपरिक लोककलेची जोड देऊन विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्याचा अभिनव प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
या उपक्रमासाठी सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा आणि सहायक वनसंरक्षक सुनील लाड यांचे मार्गदर्शन लाभले. कुडाळ वनपरिक्षेत्रातील सर्व वनक्षेत्रपाल, वनपाल आणि वनरक्षक यांच्या उपस्थितीत वन्यजीव सप्ताह उत्साहात पार पडला.
वन्यजीवांचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण आणि विविध अधिवासांमधील परस्पर जोडणी महत्त्वाची आहे. या संकल्पनेतून वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करण्याचा संदेश वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून देण्यात आला.













