रिक्षाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान; अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत
खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे महामार्गावरून सर्व्हिस रोडवर येणाऱ्या ट्रकला भरधाव रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक अख्तर मापकर (रा. अलसुरे मोहल्ला) जखमी झाले असून, त्यांना स्थानिक नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी धन्वंतरी रुग्णालयात दाखल केले. धडक इतकी भीषण होती की रिक्षाच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा आणि ट्रक ही दोन्ही वाहने मुंबई-गोवा महामार्गावरून सर्व्हिस रोडवर येत होती. यावेळी पुढे असलेल्या ट्रकला रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून चालक अख्तर मापकर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी चालकाला धन्वंतरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
अपघातग्रस्त रिक्षा क्रमांक MH 08 BC 1334 असून ट्रक क्रमांक MH 12 MV 5224 आहे. अपघातानंतर महामार्गावरून सर्व्हिस रोडवर येणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या धडकेमुळे काही काळ भरणे नाका परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्याने सर्व्हिस रोडवरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालकांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला.
भरणे नाका परिसरात महामार्गावरून सर्व्हिस रोडवर येताना वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरीने वाहन चालवावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.













