मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे अपघात; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण तालुक्यातील सावर्डे नजीक कोंडमळा येथे शनिवारी दि. २८ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास भीषण रस्ते अपघात घडला. उतारावर थांबलेल्या मालवाहू ट्रकला मुंबईहून आपल्या गावी जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात संगमेश्वर तालुक्यातील ओझरकोंड येथील सूरज डावल (२५) आणि ऋतिक गिजे (२३) हे जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दोघेही मुंबई येथून आपल्या गावी जाण्यासाठी दुचाकीने प्रवास करत होते. शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास त्यांची दुचाकी कोंडमळा येथील उतारावर पोहोचली असता रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या मालवाहू ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने दुचाकीचे नुकसान झाले, तर दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर वालावलकर रुग्णालय येथे अधिक उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहने थांबविण्याच्या ठिकाणांबाबत आणि विशेषतः उताराच्या भागात उभ्या असलेल्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. पहाटेच्या वेळी दृश्यमानता कमी असताना अशा प्रकारे रस्त्यावर थांबलेली वाहने वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे महामार्गावर अवजड वाहने उभी करण्याबाबत योग्य खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
या अपघातप्रकरणी जखमी सूरज डावल यांचे काका संजय सखाराम डावल यांनी फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. शनिवारी सायंकाळपर्यंत सावर्डे पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. पुढील तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.













