गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या पारंपरिक पायवाटांची दुरूस्ती करण्यास वनविभागाची हरकत

Google search engine
Google search engine

खेड मधील गडकिल्ल्यांकडे शिवभक्त व पर्यटकांची पाठ.

देवेंद्र जाधव | खेड : सह्याद्री पर्वताच्या कुशीत इतिहासाची साक्ष देत डौलाने उभे असलेले तसेच शिवभक्त व पर्यटकांचे आकर्षण असलेले गडकिल्ले, रसाळगड, सुमारगड, महिपतगड या खेड तालुक्यातील गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या पारंपरिक पायवाटा दुरूस्त करण्यास वनविभाग हरकत घेत असल्याने या ऐतिहासिक गडकिल्ल्यांकडे शिवभक्त व पर्यटकांनी पाठ फिरवली आहे.

रसाळगड, सुमारगड, महिपतगड या तिन्ही गडकिल्ल्यांच्या सभोवती वनविभागाची जमीन आहे. गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या बहुतांश पायवाटा या वनजमनीतून जात आहेत मागील कित्येक वर्षे या गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या पायवाटांची देखभाल दुरुस्ती वन विभागाकडून झालेली नाही. अनेक ठिकाणी दरडी वगैरे कोसळून पारंपरिक पायवाटा बंद झालेल्या आहेत. हा गडकिल्ल्यांचा परीसर घनदाट जंगलांनी व्यापला आहे. गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या पारंपरिक पायवाटा सुरक्षित नसल्याने वरील तीन्ही गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या शिवभक्त व पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

महाराष्ट्र शासन गडकिल्ल्यांच्या विकासासाठी व गडकिल्ल्यांवर पर्यटन वाढण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु याच शासनाचा एक भाग असलेला वनविभाग साधी पायवाटही दुरूस्त करून देत नाही. यामुळे कोकणातील अनेक गडकिल्ले विकासापासून वंचित राहात आहेत.

रसाळगड, महिपतगड, सुमारगड, या ऐतिहासिक पवित्र गडकिल्ल्यांवर स्थानिक गावांतील ग्रामदेवतांची मंदिरे आहेत. मागील हजारो वर्षे या ग्रामदेवतांच्या मंदिरांची देखभाल दुरुस्ती स्थानिक ग्रामस्थ बांधव लोकवर्गणीतून करत आहेत. परंतु सध्या काही ठिकाणी गडकिल्ल्यांवरील ग्रामदेवतांच्या मंदिरांची दुरुस्ती करण्यास वनविभाग हरकत घेत असल्याने अनेक श्रद्धाळूच्या भावनांना ठेच पोहचवण्याचे काम विभागाकडून होत आहे.

काही स्वयंसेवी संस्थांनी शासनदरबारी पाठपुरावा करून किल्ले रसाळगडकडे जाणाऱ्या पायवाटेची आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी रु २ लाख व स्वागत कमान बांधण्यासाठी रु ४ लाख मंजूर करून घेतले परंतु पायवाटा दुरूस्त करण्यास व स्वागत कमान बांधण्यास वनविभाग हरकत घेत असल्याने शासनाचा निधी परत जात आहे.

खेड तालुक्यातील रसाळगड, सुमारगड, महिपतगड या गडकिल्ल्यांच्या परिसरात जे मालकी व वनविभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात जंगल वाढत आहे त्याचे श्रेय स्थानिक ग्रामस्थांना आहे. जंगलाचे संवर्धन करण्यास स्थानिक ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा आहे. वनविभागाला जंगलांचे संवर्धन करण्यास स्थानिक ग्रामस्थांची मदत चालते परंतु ग्रामस्थांना सहकार्य करण्यास वनविभाग एक पाऊल सदैव मागे असते. जंगलांची हानी न करता जेथे शक्य असेल तेथे गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या पारंपरिक पायवाटांची दुरुस्ती करण्यास वनविभागाने स्थानिक ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाला सहकार्य करावे असे जाहीर आवाहन शिवभक्त व पर्यटक बांधवांच्या वतीने महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी तर्फे वनविभाग (चिपळूण) यांना करण्यात येत आहे.