आगारांची दुरावस्था, रस्त्यात बंद पडणाऱ्या गाडया, कोलमडलेल्या वेळापत्रकांमुळे प्रवाशी त्रस्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालण्याची मागणी
रत्नागिरी | विशेष प्रतिनिधी : देवरूख आगाराच्या चालकाचा एसटीच्या सद्यस्थितीबाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे जिल्हयात पुन्हा एकदा एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे. देवरूख आगाराच्या चालकाने मांडलेली व्यथा ही केवळ देवरूख आगारापुरती मर्यादित नसून जिल्हयातील एसटी महामंडळाच्या मंडणगडपासून राजापूर पर्यंत नऊही आगारांमध्ये हीच अवस्था आणि हेच चित्र आहे. यात एसटीचे चालक वाहक आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र यातुन एसटी प्रशासन काही बोध घेणार आहे की नाही असा सवाल आता प्रवाशांतुन उपस्थित केला जात आहे.
रत्नागिरी, चिपळूण, लांजा व पाली या आगारांच्या रखडलेल्या कामांमुळे प्रवाशी गेले तीन वर्षे त्रस्त आहेत. तर आता लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात जाणाऱ्या गाडया वारंवार रस्त्यात बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर गळक्या गाडयांमुळे पावसात तर प्रवाशांना भिजत प्रवास करावा लागत आहे.
जिल्हयात रत्नागिरी, राजापूर, लांजा, देवरूख, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड आणि दापोली अशी नऊ स्थानके आहेत. यातील रत्नागिरी, राजापूर व चिपळूण ही सर्वात मोठी व एसटीला चांगली उत्पन्न मिळवून देणारी स्थानके आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी प्रवासात 50 टक्के सवलत जाहिर केल्यानंतर एसटीच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगितले जात आहे.मात्र चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळूनही एसटीची सेवा सुधारण्याचे नाव घेत नसल्याने प्रवाशी हवालदील झाले आहेत.जिल्हयातील सर्व आगारांमध्ये असलेल्या एसटी बस या 10 ते 15 वर्षे इतक्या जुन्या झालेल्या आहेत. त्याच गाडया प्रवाशी सेवेसाठी जवळ आणि लांब पल्ल्यांसाठी वापरल्या जात आहेत. मुंबई, सोलापूल, लातुर, पुणे, कोल्हापूर, बोरिवली या मार्गावरही अनेक आगारांतुन जुन्याच गाडया वापरल्या जात असल्याने त्या रस्त्यात अनेक वेळा बंद पडत आहेत. कधी तांत्रिक कर्मचारी येऊन गाडया दुरूस्त करत आहेत तर कधी प्रवाशांना सामानाची ओझी घेऊन रस्त्यात उभे राहून मग येणाऱ्या दुसऱ्या एखाद्या आगाराच्या गाडीने मिळेल त्या सीटवर बसुन तर कधी उभ्याने प्रवास करावा लागत आहे. आगाऊ आरक्षण करूनही प्रवाशांच्या नशीबी असे हाल येत आहेत. यात महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची परवड होत आहे. या नाहक होणाऱ्या मनस्तापामुळे नको ती सलवत अशा प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक व महिलांमधून उमटत आहेत.
शासनाकडून आणि एसटी प्रशासनाकडून नवीन गाडया येणार, प्रत्येक आगारांना गाडया देणार अशा घोषणा केल्या जात आहेत. प्रत्यक्षात मात्र अनेक आगारांमध्ये गेल्या काही वर्षात एकही नवीन गाडी प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. सध्या ज्या पांढऱ्या गाडया एसटीच्या प्रवाशी सेवेत आहेत. एसटीच्या जुन्या लाल डब्यांच्या गाडयांच्या चेसवर लाल डबा काढून नवीन पांढऱ्या रंगाचे मॉडेल बसविण्यात आले आहे. मात्र हा भार त्या जुन्या चेसला झेपत नसल्याने अनेक गाडया चढावात चढताना चालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र असे असतानाही स्थानिक प्रशासनाकडून चालक वाहकांना अशा गाडया घेऊन जाण्यास सांगितले जात आहे व त्यामुळे मग त्या बंद पडत आहेत. रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हयाला नवीन 50 गाडया आठ महिन्यापुर्वी देण्यात आल्या होत्या. पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह एसटीतुन प्रवास करत या गाडया जिल्हयात दिल्याचे जाहिर केले होते. मात्र त्यानंतर त्या गाडया जिल्हयातील कोणकोणत्या आगाराला देण्यात आल्या हे आजही कळलेले नाही. राजापुर आगारात तर सगळया गाडया जुन्या आहेत. 15 वर्षानंतर गाडया स्क्रॅब करण्याचा नियम एसटी महामंडळाला लागू नाही काय असा सवालही उपस्थित केला जातआहे.
अनेक आगारांमध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, स्पेअरपार्ट उपलब्ध होत नाहीत, टायर उपलब्ध होत नाहीत अशाही तक्रारी आहेत. अनेक आगारातील कर्मचारी हे प्रवाशांनी उध्दट वागत असल्याच्याही प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
ज्याने एसटीच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगणारा व्हिडीओ व्हायरल केला त्या चालकाचे एसटीने निलंबन केले आहे. मात्र अशा प्रकारे चालकाचे निलंबन करून प्रश्न सुटणारा नाही. याच्या मुळाशी जाऊन चौकशी केली पाहिजे. शोध घेतला पाहिजे, चांगल्या गाडया उपलब्ध करून दिल्या पाहिजेत अशी प्रवाशांची मागणी आहे.
या एकूणच परिस्थितीत एसटी प्रशासनाचा कारभार सुरू आहे. चालक वाहकांचा जीव धोक्यात आहेच पण एसटीतुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीवही धोक्यात आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री म्हणून ना. एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे आणि रत्नागिरी जिल्हयातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी प्रवाशी जनतेतुन होत आहे.










