कुणाल मुंडेकर याला गोडबोले पुरस्कार जाहीर

आबलोली : गुहागर तालुक्यातील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली या प्रशालेत इयत्ता दहावी मध्ये शिकणारा कु.कुणाल संतोष मुंडेकर याला चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा चतुरंग सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील २९ विद्यार्थ्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून १५ जानेवारी २०२३ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कुणाल हा आबलोली विद्यालयाचा हुशार, गुणवंत विद्यार्थी असून त्याने अनेक स्पर्धात्मक उपक्रम व शालेय अभ्यासक्रमात यश संपादन केले आहे. गोडबोले पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बाईत, सीईओ सचिन बाईत, सचिव राकेश साळवी, संचालक अविनाश कदम, सुषमा उकार्डे यांसह संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक डी.डी.गिरी आदींनी अभिनंदन केले. या यशासाठी शाळेतील शिक्षकांसह वडील संतोष मुंडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.