दापोली तालुक्यातील शैक्षणिक संस्थांना मिळणार आता बळ… कारण जाणून घ्या

दापोली l प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील शैक्षणिक संस्थाना आर्थिक मदत देण्यासाठी तालूक्यातील सहकारी संस्था पुढे येत असून दापोली शिक्षण संस्थेच्या वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालायासाठी झालेल्या नफ्यातून ३० लाख रुपयांची देणगी देण्याचा निर्णय ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने घेतला असुन त्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी त्यास मंजूरी दिल्यावर हि देणगी देण्यात येणार आहे.

दापोली तालुक्यातील विद्यार्थाना यापूर्वी विज्ञान विषयाचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी चिपळूण किंवा रत्नागिरी येथील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागत असल्याने दापोली अर्बन बँकेने १९९८ मध्ये धाडसी निर्णय घेत दापोली शिक्षण संस्थेला दरवर्षी नफ्यातून देणगी देण्याचा निर्णय घेतला होता, या बँकेने दापोली शिक्षण संस्थेला ३६ लाख रुपयांची देणगी दिल्याने या विज्ञान महाविद्यालयाचे नामकरण दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज असे करण्यात आले होते, आता या महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तर व आचार्य (पिएचडी) पर्यंत शिक्षण दिले जात आहे. याच महाविद्यालयात वाणिज्य विभागाचे पदवीपर्यंत शिक्षण दिले जाते.

दापोली अर्बन बँकेच्या पावलावर पावूल टाकत आता ब्राम्हण हिवार्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दापोलीच्या संचालक मंडळाने दापोली शिक्षण संस्थेच्या वाणिज्य महाविद्यालयासाठी सुरुवातील ३० लाख रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या पतसंस्थेला २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात २ कोटी ४५ लाख ०८ हजार ८९४ रुपये इतका नफा झाला असून या नफ्यातून ३० लाख रुपयांची देणगी देण्यात येणार आहे. संचालक मंडळाने सभासदाना पाठविलेल्या २०२२-२०२३ च्या आर्थिक वर्षाच्या अहवालात केलेल्या नफा विभागणीमध्ये ३० लाखांची हि रक्कम दाखविली असून या नफा विभागणीस २४ सप्टेंबर रोजी होणार्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी मान्यता दिल्यास हि देणगी दापोली शिक्षण संस्थेला देण्यात येणार आहे. दरवर्षी नफ्यातून काही वर्षे अशी ठरविक रकमेची देणगी दिल्यास दापोली शिक्षण संस्थेच्या वाणिज्य महाविद्यालयास ब्राम्हण हिवार्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दापोली वाणिज्य महाविद्यालय असे नाव देण्याचा प्रस्ताव दापोली शिक्षण संस्थेने या पतसंस्थेकडे दिला असल्याची माहिती शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी यांनी दिली आहे.