रमेश शिर्के यांची कार्यकारी अभियंता सार्वजनिक बां. वि. चिपळूण यांच्याकडे केली मागणी
चिपळूण (वार्ताहर) :तालुक्यातील गुहागर-विजापूर या महामार्गावरील चिवेली फाटा (घोणसरे) येथे स्थानदर्शक फलक लावावेत आणि याच मार्गावर चिवेली फाटा येथे दोन्ही बाजूने गतीरोधक बसविण्याबाबत चिवेली पंचक्रोशी विकास मंडळाचे प्रमुख कार्यवाह रमेश शिर्के यांनी याबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण यांना पत्र देऊन समस्या मार्गी लावण्याबाबत मागणी केली आहे.
या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, वरील विषय क्रमांक १ बाबत आपणास विनंती करण्यात येते की, गुहागर-विजापूर या राज्य महामार्गाला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. या मार्गावर चिपळूण व गुहागर या दोन्ही तालुका ठिकाणांच्या मध्यावर चिवेली फाटा (मु. उमरोली- घोणसरे) ही एक मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. एस.टी. महामंडळाच्या तिकीटांवर, आरक्षण तिकीटांवर सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून चिवेली फाटा असाच उल्लेख आहे. या बरोबरच येथील दुकानांच्या पाट्या, दुकानदारांची बिले, चलने यावर सुध्दा “चिवेली फाटा” असाच उल्लेख असतो. या महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वाहतूक चालू असते. रात्रीच्या वेळी काळोखात या ठिकाणी योग्य जागी स्थानदर्शक फलक नसल्यामुळे एस्.टी. ने किंवा खाजगी वाहनाने अथवा मालवाहतूक करणान्या वाहनातून प्रवास करणान्या प्रवाशांना फारच अडचण भासते. वास्तविक पहाता मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा अगदी छोटी गावे किंवा वाड्यांचे स्थानदर्शक व दिशादर्शक फलक ठळक अक्षरात व उत्तम प्रकारे लावलेले आढळतात. चिपळूण-गुहागर मार्गावर सुद्धा अनेक गावे- वाड्या दर्शविणारे फलक आहेत. अशाच प्रकारे चिवेली फाटा येथे स्थानदर्शक व दिशादर्शक सुयोग्य ठळक व कायम स्वरुपी मजबूत फलक लावण्यात यावा अशी आपणास उपरोक्त संस्थेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.
त्याचबरोबर विषय क्रमांक २ च्या अनुषंगाने वर उल्लेखलेल्या रस्त्यावर चिवेली फाटा येथे नेहमीच प्राणघातक अपघात होत असतात. विशेषतः चिपळूण कडून गुहागरकडे जाणारी वाहने घोणसरे एस.टी. स्टॉप पासून सुसाट वेगाने येत असतात, त्यामुळे येथे अनेक अपघात झाले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांना अनेकदा रस्ता ओलांडणे फारच अडचणीचे व धोकादायक ठरते. यासाठी या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिवेली फाटा येथे दोन्ही बाजूने गतीरोधक बसविण्यात यावेत, ज्यामुळे लोकाना रस्ता ओलांडणे व बाजारपेठेत फिरणे शक्य होईल.असे ही त्यांनी सूचित केले आहे.
वरील दोन्ही बाबतीत आपल्या संबंधित खाते, विभाग किंवा अधिकाऱ्यांकडून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी रमेश शिर्के यांनी केली आहे. या संदर्भातील पत्राच्या प्रती. . मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी, जिल्हाधिकारी रत्नागिरी., गटविकास अधिकारी पंचायत समिती, चिपळूण, आ. भास्कर जाधव. यांना सुध्दा देण्यात आल्या आहेत.












