कातकरी आदिवासी समाजासाठी आयोजित विशेष शिबिरात 73 जणांनी घेतला लाभ

मालवण तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजन : आरोग्य तपासणी व विविध दाखल्यांचे वितरण

मालवण | प्रतिनिधी : मालवण तहसील कार्यालय येथे गुरुवारी कातकरी आदिवासी समाजासाठी आयोजित विशेष शिबिरात 73 जणांनी लाभ घेतला. अशी माहिती तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांनी दिली. प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे, आतरिक्त उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई, तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, नायब तहसीलदार नागेश शिंदे, मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे, पोलीस उपविभागीय अधिकारी किशोर सावंत, मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या उपस्थितीत उपस्थित कातकरी यांना मार्गदर्शन करत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच मुलांचे शिक्षण अर्धवट सोडणार नाही व बालविवाह करणार नाही अशी शपथ यावेळी त्यांना देण्यात आली.

मालवण तालुक्यातील विविध भागातून आलेल्या 73 कातकरी आदिवासी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. वय दाखला, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, आधार कार्ड यासह विविध दाखले वितरण यावेळी करण्यात आले. तर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण येथील अधिकारी गणेश मेटे यांच्या उपस्थितीत जातीचा दाखल नोंदणी प्रक्रियाही यावेळी करण्यात आली. बँक अधिकारी यांच्या उपस्थितीत पासबुक काढून denyat🎴आली. दरम्यान काही ठिकाणी बेघर स्थितीत राहणाऱ्या कातकरी समाज साठी जागा उपलब्ध करून घरकुल बांधणी करून देण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे तहसीलदार वर्षा झालटे यांनी सांगितले.शोषीत मुक्ती अभियान संस्था सिंधुदुर्ग संस्था अध्यक्ष उदय आईर यासह आरोग्य विभाग कर्मचारी, तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य शिबिरास लाभले.