पालकमंत्री उदय सामंत यांचा खोकेधारकांना दिलासा
लांजा (प्रतिनिधी) लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी नोटीसा बजावलेल्या १६ खोकेधारकांना अखेर दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित खोकेधारकांची बाजू लक्षात घेऊन सदरची कारवाई थांबवण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे सदरच्या खोकेधारकांवरील कारवाईची टांगती तलवार दूर झाली आहे. याबद्दल त्यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
लांजा शहरातील शाळा क्रमांक ५ रस्ता तसेच साटवली ग्रामीण मार्ग १६८ वरील १६ अनधिकृत खोकेधारकांना लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी नोटीस बजावून हे संबंधित खोके तात्काळ उचलावेत अशा सूचना केल्या होत्या. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्टीचे दिवस असल्याने सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी या खोकेधारकांवर कारवाई होण्याची शक्यता होती. मात्र संबंधित खोकेधारकांनी लांजा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, शिवसेना (शिंदे गट) विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, युवा सेना तालुका अधिकारी राजू धावणे, शहर प्रमुख सचिन डोंगरकर, युवा शहराधिकारी प्रसाद भाई शेट्ये यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचीभेट घेऊन आपली कैफियत मांडली होती.
त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी या खोकेधारकांचा सहानुभूतीने विचार करून व जिल्हाधिकारी यांना दूरध्वनी करून सदर कारवाई थांबविणेबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी लांजा यांना तशा सूचना केल्या व कारवाई थांबवण्यात आली आहे.
त्याबद्दल सर्व सोळा खोके धारकांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.