देवरूखच्या राजाचे वाजत गाजत भावपूर्ण वातावरणात विसर्जन

देवरूख : देवरुखचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवरूख शहरातील हनुमान मंदिरातील गणरायाला काल सोमवारी रात्री मिरवणुकीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. या गणरायाची विसर्जन मिरवणुक विशेष लक्षवेधी ठरली.

जय हनुमान मित्र मंडळ देवरुख व पोलीस कर्मचारी देवरुख यांच्या वतीने हनुमान मंदिरात गेली अनेक वर्षे २१ दिवस गणेशोत्सव साजरा केला जात आहे. नवसाला पावणारा गणराय म्हणून श्रींची ख्याती सर्वदूर आहे. श्रींच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागते. यावर्षी हा गणेशोत्सव विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये दररोज श्रींची पूजा अर्चा, आरती, भजन, जाखडी नृत्य, टिपरी नृत्य सादर झाले. सामाजिक बांधिलकी जपत मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.

काल सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता देवरूखच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला हनुमान मंदिरापासून प्रारंभ झाला. स्टेट बँक रोड, एस.टी. स्टँड, बाजारपेठ, खालची आळी मार्गे सप्तलिंगी नदी अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पोलीस कर्मचारी, हनुमान मित्रमंडळाचे कार्यकर्ते, शहरातील अबालवृध्द सहभागी झाले होते. रात्री उशिरा गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात सप्तलिंगी नदीपात्रात गणरायाला जड अंतःकरणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला.